Headlines

तिवसातील पिसाळलेल्या गायीचा अखेर मृत्यू:सारसी जंगल परिसरात दफन; नागरिकांना दिलासा




तिवसा शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दहशतीत ठेवणाऱ्या पिसाळलेल्या गायीचा अखेर सारसी जंगल परिसरात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी गायीने प्राण सोडल्यानंतर तिला खड्डा करून दफन करण्यात आले. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी या गायीने शिक्षक कॉलनी आणि रतनगीरनगर परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे ही गाय आक्रमक झाली होती. तिच्या हल्ल्यात एका मुख्याध्यापिकेसह तब्बल सहा जण जखमी झाले होते, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गायीला पकडणे नगरपंचायत प्रशासनासमोर एक मोठे आव्हान होते. जीवितहानी टाळण्यासाठी तिवसा येथील प्राणीमित्र अविनाश पांडे, सामाजिक कार्यकर्ते पिंटू राऊत, प्रणव गौरखेडे आणि काही धाडसी युवक तसेच नगरपंचायत प्रशासनाच्या चमूने पुढाकार घेतला. त्यांनी एका बँकेच्या गेटजवळ शिताफीने या गायीला जेरबंद केले. गायीला पकडल्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने तिला खबरदारी म्हणून काही इंजेक्शन देण्यात आली. त्यानंतर तिला सारसी जंगलालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंड परिसरामागे अधिवासात सोडून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. दोन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाली. कंत्राटदार पिंटू राऊत यांनी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून मृत गायीला दफन केले. या घटनेमुळे तिवसा शहरातील नागरिकांमध्ये पसरलेली भीती आता कमी झाली आहे. तिवसा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता आरोग्य विभागाच्या चमूने गायीला पकडून बंदोबस्त लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने कारवाई केली. लवकरच शहरातील इतर मोकाट जनावरांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत