![]()
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात सोमवारी संध्याकाळी एका ४० वर्षे जुन्या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अन्य ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला मोठे यश आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण इमारत रिकामी केली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नेमकी घटना कुठे आणि कशी घडली? मुंब्रामधील अमृत नगर भागात, जनता बेकरी जवळील दर्गा गल्लीत ‘फैयाज अपार्टमेंट’ नावाची इमारत आहे. ही इमारत तळमजला अधिक चार मजल्यांची (Ground + 4) असून ती सुमारे ३८ ते ४० वर्षे जुनी आहे. ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा स्लॅब अचानक तुटला आणि तो थेट पहिल्या मजल्यावरील बाल्कनीवर जाऊन आदळला. या घटनेमुळे तिथे उपस्थित असलेले लोक थेट ढिगाऱ्याखाली दबले गेले. शर्थीचे बचावकार्य; ५ जण सुखरूप स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर बचावकार्य राबवत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व ६ जणांना बाहेर काढण्यात आले. यातील ५ जणांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि त्यांना सुरक्षित वाचवण्यात यश आले. १३ वर्षीय आस्माचा दुर्दैवी मृत्यू या दुर्घटनेत १३ वर्षीय आस्मा कादर शेख ही मुलगी ढिगाऱ्याखाली दबल्याने गंभीररीत्या जखमी झाली होती. बचाव पथकाने तिला तातडीने कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. इमारत रिकामी केली; ७० रहिवाशांचे स्थलांतर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फैयाज अपार्टमेंट ही इमारत ‘सी-२ बी’ (C2B) श्रेणीतील म्हणजेच धोकादायक इमारतींच्या यादीत होती. या दुर्घटनेनंतर पुढील धोका टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण इमारत तत्काळ रिकामी केली आहे. या इमारतीत वास्तव्य करणाऱ्या सुमारे ७० ते ८० रहिवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७८ आणि १२३ मध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. हेही वाचा.. महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर:कोकण, घाटमाथा, विदर्भासह अनेक भागांना अलर्ट, धरणसाठ्यातही मोठी वाढ राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा
Source link
ठाण्यात दुर्घटना:इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जणांची सुखरूप सुटका
