IND vs ZIM Series : भारत-झिम्बाब्वे मालिका संपल्यानंतर एक भन्नाट प्रसंग घडला. एका चाहत्याने चक्क डोक्यावर ऑटोग्राफ मागितला! व्हीव्हीएस लक्ष्मण अन् ईशान किशनचा व्हिडिओ व्हायरल.

VVS लक्ष्मण आणि ईशान किशनला फॅनची भन्नाट मागणी
भारताने झिम्बाब्वेचा क्लीन स्वीप केल्यानंतर कार्यवाहक मुख्य प्रशिक्षक VVS लक्ष्मण आणि विकेटकीपर फलंदाज ईशान किशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक फॅन दोघांकडून ऑटोग्राफ घेताना दिसत आहे. मात्र, या फॅनने ऑटोग्राफ घेण्यासाठी डायरी, कागद किंवा हात पुढे केला नाही. त्याने थेट आपल्या डोक्यावर सही करण्याची मागणी केली. फॅनची ही मागणी ऐकल्यानंतर VVS लक्ष्मणने कोणताही संकोच न करता लगेच त्याच्या डोक्यावर ऑटोग्राफ दिला.
यानंतर फॅनने ईशान किशनकडेही अशीच मागणी केली. सुरुवातीला ईशान थोडा संकोचला आणि त्याने नकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, फॅनने पुन्हा आग्रह केल्यानंतर ईशानला हसू आवरलं नाही. शेवटी त्यानेही फॅनच्या डोक्यावर ऑटोग्राफ दिला.
हा मजेशीर प्रसंग वरिष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो समोर आल्यानंतर चाहतेही या प्रसंगाचा चांगलाच आनंद घेत आहेत.
गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत VVS लक्ष्मणकडे जबाबदारी
दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ गेला नव्हता. त्यामुळे सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख VVS लक्ष्मण आणि त्यांच्या स्टाफकडे कार्यवाहक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.
VVS लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकांच्या तुलनेत झिम्बाब्वेविरुद्ध दमदार कामगिरी केली. संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूने आपापल्या परीने योगदान दिलं आणि त्याचा परिणाम मालिकेच्या निकालातही दिसून आला.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिली मालिका जिंकली
टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाने जिंकलेली ही पहिलीच टी२० मालिका ठरली आहे. यापूर्वी टीम इंडियाला आयर्लंडविरुद्ध २-० आणि इंग्लंडविरुद्ध ४-० अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या क्लीन स्वीपमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
विशेष म्हणजे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदाच टी२० मालिका जिंकली आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीनेही दमदार कामगिरी केली. त्याने तीन सामन्यांच्या तीन डावांमध्ये १५१ धावा केल्या. त्याच्या नावावर दोन अर्धशतकं आहेत. या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

