Chandrpur News: चंद्रपुरातील टीटीसी सेंटरमध्ये सहाची क्षमता असताना १८ वन्यजीव ठेवले .यामुळेच मोठ्या प्राण्यांना जास्त काळ लहान पिंजऱ्यात रहावे लागत असून त्यांचा आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर
चंद्रपूर येथील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ हे महाराष्ट्र वन विभागांतर्गत चालवले जाणारे वन्यजीव बचाव व उपचार केंद्र आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरालगत चंद्रपूर वन विभागात हे केंद्र आहे. जखमी किंवा मानवी वस्तीत शिरलेल्या वाघ, बिबट्या; तसेच इतर वन्यप्राण्यांना येथे आणून तात्पुरते उपचार केले जाते. सुमारे १२ हेक्टर क्षेत्रावर हे केंद्र वसले आहे.
१३ वाघ आणि पाच बिबटे
याच परिसरात ‘एसटीपीएफ’च्या क्वार्टर्सही आहेत. मात्र, हे केंद्र कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी नसून, केवळ तात्पुरत्या उपचारासाठी आहे. केंद्राची क्षमता केवळ सहा वन्यजीवांची असताना सध्या येथे १३ वाघ आणि पाच बिबटे असे एकूण १८ वन्यजीव पिंजऱ्यांत ठेवण्यात आले आहेत. परिणामी, मोठ्या प्राण्यांना दीर्घ काळ लहान पिंजऱ्यांत राहावे लागत असून, त्यांच्या आरोग्य व वर्तनावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
मानवी वस्त्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले
चंद्रपूर आणि लगतच्या भागांत वाघांच्या मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हल्लेखोर किंवा मानवी वस्तीजवळ वारंवार वावरणाऱ्या वाघ-बिबट्यांना पकडून या ट्रान्झिट सेंटरमध्ये आणले जात आहे. चंद्रपूर, नागभीड आणि सिंदेवाही परिसरातून वाघ, बिबट्या; तसेच अस्वल यांना जेरबंद करून आणण्याचे प्रमाणही वाढले आहे.
वन्यजीवांना ठेवण्यासाठी पुरेसे स्वतंत्र कक्ष उपलब्ध नाहीत
मात्र, या सर्व वन्यजीवांना ठेवण्यासाठी केंद्रात पुरेसे स्वतंत्र कक्ष किंवा पिंजरे उपलब्ध नाहीत. केंद्राच्या विस्तारासाठी उच्चस्तरीय बैठका झाल्या असून, अत्याधुनिक, बहुउपयोगी वन्यजीव बचाव पिंजरे तयार करण्याबाबतही चर्चा झाली आहे. ‘टीटीसी’च्या विस्तारीकरणाची योजना हाती घेण्यात आली आहे.
ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर कार्ये
.वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया
.जखमी वन्यप्राण्यांवर तातडीचे उपचार
.मानव–वन्यजीव संघर्षात जखमी झालेल्या प्राण्यांची देखभाल

