Headlines

गोधनी क्लोरीन घटनेची शंकरपुरात पुनरावृत्ती ; तीन दिवसांत दुसरी दुर्घटना, संकट टळले ,सुरक्षेवर मात्र प्रश्नचिन्ह


Chlorine Gas Leak: गोधनी येथील गॅस गळतीला तीन दिवसही उलटले नसताना तीन दिवसांत नागपूरात दुसरी मोठी दुर्घटना घडली .शंकरपुर जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गळती झाल्याने सुरक्षेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

क्लोरीन गळती
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, नागपूर :गोधनीतील क्लोरिन गळतीनंतर गावातील सुमारे ४० कुटुंबांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले होते. प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी गावात परतण्यास हरकत नसल्याचे सांगितले होते. मात्र, भीतीमुळे अनेक नागरिक परतण्यास तयार नव्हते. तीन दिवसांनंतर काही कुटुंबे गावात परतली असली, तरी वातावरण अजूनही पूर्ववत झालेले नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘गावात परतलो, पण घशात दुखणे, खोकला आणि श्वास घेण्याचा त्रास अजून जाणवतो.आईच्या फुफ्फुसात गॅस अडकल्यासारखे वाटते. काहींना उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे’, अशी व्यथा आकाश कारसकर यांनी मांडली

नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी

क्लोरिन गॅसचे परिणाम काही वेळा तात्काळ, तर काही वेळा उशिराने जाणवू शकतात. त्यामुळे प्रशासनाने गावात आरोग्य सर्वेक्षण करावे, प्रत्येक कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करावी आणि बाधितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

क्लोरिन सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे

गोधनीतील जखमा अजून भरलेल्या नसताना शंकरपूरची घटना घडल्याने क्लोरिन सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. आता प्रशासनाने केवळ गळती थांबविण्यावर न थांबता सर्व जलशुद्धीकरणकेंद्रांची सुरक्षा तपासणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोठी दुर्घटना टळली

गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून क्लोरिन गॅसगळती होऊन तीन दिवसही उलटत नाहीत तोच गुरुवारी शंकरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातही अशीच घटना घडली. प्रशासनाने तातडीने हालचाली करीत गळतीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, सलग घडलेल्या या घटनांमुळे जलशुद्धीकरण केंद्रांमधील सुरक्षा व्यवस्था, सिलिंडर हाताळणी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जलशुद्धीकरण केंद्रातून सोमवारी क्लोरिन गॅसची गळती

गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोमवारीक्लोरिन गॅसची गळती झाली होती. या घटनेत अनेक नागरिक बाधित झाले. काहींवर अद्याप उपचार सुरू असून काही जण अतिदक्षता विभागात असल्याची माहिती आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही, त्यांनाही खोकला, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास, छातीत जळजळ अशा तक्रारी जाणवत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

घटनेची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञ समिती

गोधनीतील घटनेची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयात सादर केला आहे. मात्र, अहवालातील निष्कर्ष अद्याप जाहीर झालेले नाहीत. तोवरच शंकरपूर येथे क्लोरिन गळतीची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाच्या दाव्यांकडे नागरिकांचे सावधपणे लक्ष

जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना आहेत का, सिलिंडरांची नियमित तपासणी होते का, आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशिक्षित यंत्रणा उपलब्ध आहे का, असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने मात्र शंकरपूर येथील घटना गंभीर स्वरूपाची नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. तरीही गोधनीतील अनुभव ताजा असताना दुसऱ्या केंद्रात गळती झाल्याने प्रशासनाच्या दाव्यांकडे नागरिक सावधपणे पाहत आहेत.

Maharashtra TimesVersova Bandra Coastal Road: वर्सोवा वांद्रे सागरी रस्त्याला विलंबाची किनार ; प्रकल्पाला १,४२१ दिवसांची मुदतवाढ

अग्निशमन केंद्राची चमू तातडीने घटनास्थळी दाखल

गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बेसा अग्निशमन विभागाला शंकरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून क्लोरिन गॅस गळती होत असल्याचा कॉल प्राप्त झाला. गोधनीतील घटना नुकतीच घडल्याने प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागालाही माहिती देण्यात आली. नरेंद्रनगर अग्निशमन केंद्राची चमू तातडीने घटनास्थळी पोहोचली.

Maharashtra TimesPune Metro: मेट्रोला पादचाऱ्यांचा विसर ;पुण्यातील नागरिकांचे हाल, धावत्या वाहतुकीतून रस्ता ओलांडण्याची वेळ

गळती पूर्णपणे थांबविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू

गळती होत असलेले सिलिंडर जलशुद्धीकरण केंद्रातील अधिकारी-कर्मचारी, तज्ज्ञ आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षितरीत्या बाजूला करण्यात आले. जेसीबीच्या मदतीने हे सिलिंडर खुल्या जागेत लटकवून ठेवण्यात आले. गळती वाढू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे अग्निशमन विभागातील सूत्रांनी सांगितले. ओसीडब्ल्यू आणि पेसोच्या तज्ज्ञ चमूला घटनास्थळी बोलावण्यात आले. कॉस्टिक सोडा आणि बर्फाच्या मदतीने गळती पूर्णपणे थांबविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा