Headlines

'गोकुळ'ची दहीहंडी महायुतीच फोडणार!:धनंजय महाडिकांचा 25-0 ने विजयाचा दावा, काय म्हणाले महाडिक?




यंदा गोकुळ दूध संघाची दहीहंडी महायुतीच फोडणार असून 25 विरुद्ध शून्य अशा एकतर्फी फरकाने गोकुळवर पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. सतेज पाटील यांच्या ‘समविचारी आघाडी’कडे सध्या निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवारच शिल्लक नसल्यामुळे ते आता नाईलाजाने सर्वांच्या भेटीगाठी घेत फिरत आहेत, असा टोला महाडिक यांनी लगावला. आता गोकुळच्या राजकारणात समविचारी पक्षाचा नारा देत फिरणाऱ्या सतेज पाटील यांची ही समविचारी आघाडी यापूर्वी कुठे गेली होती? असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार आणि संचालकांच्या भेटीगाठी सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करत, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदा गोकुळवरही महायुतीचीच निर्विवाद सत्ता राहील, असा ठाम विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. धनंजय महाडिक म्हणाले, मी यापूर्वी देखील सांगितलं होतं आत्ता सुद्धा सांगतो राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने सतेज पाटील आणि आम्ही एकत्र येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत, असे महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. गोकुळच्या रणधुमाळीत वाढला राजकीय संघर्ष गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीमुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणूक प्रक्रियेत मंत्री हसन मुश्रीफ गट, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष विरुद्ध महाडिक गट असा सुप्त संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. या चुरशीच्या लढतीमुळे गोकुळच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणे उदयाला येण्याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. सतेज पाटलांची मोर्चेबांधणी दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या बाजूने काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी एकहाती रान उठवले आहे. महायुतीमध्ये एकटे पडलेल्या भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका त्यांनी लावला असून, समविचारी नेत्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याची त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सतेज पाटलांच्या या रणनीतीमुळे आता गोकुळच्या निवडणुकीत नेमका कोणता निकाल लागणार आणि कुणाचा वरचष्मा राहणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत