Headlines

गेल्या वर्षी धो धो बरसला, यंदा मात्र रुसला; ‘एल निनो’मुळे पुण्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा १११ मिमी कमी पाऊस| Maharashtra Times


Pune Rain: महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी जून महिन्यात पुढील प्रवास मंदावला. पुण्यात सुरुवातीचे पंधरा दिवस तर उन्हाचे चटके बसत होते. २२ तारखेनंतर दाखल झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नाही.

पुणे पाऊस
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘ एल निनो ’मुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणामुळे यंदा मान्सूनच्या प्रवासाला आगमनापासूनच अडथळे निर्माण झाले. लांबलेला प्रवास आणि अनुकूल स्थितीअभावी पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात पावसाला जूनची सरासरी ओलांडता आलेली नाही. पुण्यात जूनच्या सरासरीच्या निम्मादेखील पाऊस पडला नाही. शहरात एक ते ३० जूनदरम्यान केवळ ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

२२ जूनला मान्सून दाखल

महाराष्ट्रात मान्सून यंदा नेहमीप्रमाणेच दाखल झाला. मात्र, पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण नव्हते. त्यामुळे दोन आठवडे तो कोकणातच रेंगाळला. जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाऐवजी कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट होती. पहिले दोन आठवडे रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके बसत होते. त्यामुळे पावसाचा हंगाम सुरू होऊनही २० जूनपर्यंत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदवहीत पावसाच्या रकान्यासमोर शून्य आकडा लिहिलेला होता. २१ जूनला महिन्यात पहिल्यांदा पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसल्या आणि २२ जूनला मान्सून शहरात दाखल झाला. आठ दिवसांत हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. मात्र, आकड्यांमध्ये समाधानकारक वाढ झाली नाही.

Maharashtra TimesMaharashtra Rain: कोरड्या जूननंतर जुलैमध्येही दिलासा नाही? सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता; संपूर्ण महिन्यासाठी IMDचा अंदाज जाहीर

पुण्यात जूनअखेरपर्यंत सरासरी १७५ मिलिमीटर पाऊस नोंदवला जातो. या वर्षी सरासरीच्या तुलनेत १११ मिलिमीटर पाऊस कमी पडला आहे. या उलट गेल्या वर्षी मे महिन्यात जूनच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता, तर जूनमध्ये दोन महिन्यांचा पाऊस २० दिवसांत नोंदवला गेला होता. शहराच्या तुलनेत घाटमाथ्यावर गेल्या आठवडाभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रांतही पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे काही प्रमाणात धरणसाठ्यात वाढ नोंदविण्यात आली. जुलैमध्ये तरी शहरात जोराचा पाऊस व्हावा, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.

Maharashtra TimesPune Ring Road: ‘रिंग रोड’मुळे पुण्यातील बांधकामे बाधित होणार, PMRDAची कबुली; मार्गाच्या नकाशात मोठा गोंधळ

पुढील दोन दिवस पावसाची रिपरिप

शहरात मंगळवारी दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत शिवाजीनगरमध्ये ३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर जोराचा पाऊस पडला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत २४ तासांत ताम्हिणीमध्ये ५६, भिरा येथे १८५, लोणावळ्यामध्ये सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरात आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा