Headlines

‘खास मला भेटायला खर्च करून दिल्लीला येऊ नका’, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा निरोप, दुसऱ्यांच्या वेळेचीही किंमत करणारे राष्ट्रपती, महेश टिळेकरांनी सांगितला खास किस्सा


मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्र टाइन्स ऑनलाइनला दिलेल्या ‘सेलिब्रिटी कॉर्नर’ या विशेष मुलाखतीत त्यांनी फिल्म इंडस्ट्री, तसंच राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या आठवणींना उजाळा दिला.

महेश टिळेकर यांना सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक दिग्गजांचा सहवास लाभला आहे, तर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींसोबतच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या मुलाखतीत त्यांनी अनेक खास आठवणी शेअर केल्या. एक आठवण होती ती म्हणजे भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भेटीची.

महेश टिळेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत सिनेमांसोबतच ‘मराठी तारका’ या अतिशय लोकप्रिय आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती केली . या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या प्रवासादरम्यान त्यांना भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, बाळासाहेब ठाकरे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशा अनेक महान व्यक्तिमत्त्वांना जवळून अनुभवण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

Maharashtra TimesMahesh Tilekar: ‘सुगीचे दिवस आलेत, आता तुम्ही चांदीच्या ताटात जेवायचं’,आशा भोसलेंनी महेश टिळेकरांना दिलेली खास भेट
राष्ट्रपती भवनात सादर केला ‘मराठी तारका’ शो
तर ‘मराठी तारका’या शोचं राष्ट्रपती भवनातही सादरीकरण झालं होतं. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं. मात्र तेव्हा ते दिल्लीत नसल्यानं या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. याची खंत टिळेकरांना देखील होती. इतक्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याची संधी हुकल्याची हुरहूर टिळेकरांच्या मनात होती.

टिळेकरांनी अब्दुल कलाम यांच्या भेटीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या टीमसोबतही संपर्क केला. यावर अब्दुल कलाम यांनी ‘खास मला भेटायला तुम्ही खर्च करून दिल्लीला येऊ नका. मी मुंबईत येईल तेव्हा भेटुया..’असा निरोप दिला. यानंतर अब्दुल कलाम एकदा मुंबई दौऱ्यावर आले होते.राजभवनात त्यांचा कार्यक्रम होता. तेव्हा आम्हाला त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली होती. पण तेव्हा त्यांचं विमान काही तास उशीरानं आलं. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, अब्दुल कलाम यांनी निरोप दिलाय की, उगाच वाट पाहत थांबू नका, तुमचं काही काम असेल तर करून या…यावरून त्यांना दुसऱ्यांच्याही वेळेची किती किंमत होती, हे समजतं…असा हा खास अनुभव टिळेकरांनी सांगितला.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि महेश टिळेकर यांच्या भेटीचा किस्सा

Maharashtra TimesMayuri Mohite : महत्त्वाचे सीन असतील तर मला वगळलं जातं, सतत मोलकरणीच्याच भूमिका; ठरलं तर मग मालिकेमुळे मिळालं महत्व, विमलने सांगितली व्यथा
अब्दुल कलाम यांना भेटण्यासाठी तेव्हा मोठमोठे लोक आले होते. माझ्यासोबत एक आर्टिस्ट होता, हे सगळं पाहून म्हणाला की, इतकी दिग्गज मंडळी इथे आली आहेत, आपल्याला आता वेळ देतील असं वाटत नाही. पण या सगळ्या दिग्गज मंडळींची भेट झाल्यानंतर आम्हालाही भेटीची संधी मिळाली. अगदी बाजूच्या खुर्चीवर बसून त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या. अब्दुल कलाम यांनीही तुमचा शो पाहायचा आहे, पण दिल्लीत नसल्यानं शक्य झालं नाही, असं त्यांनी म्हटलं होतं तसंच सैनिकांसाठी केलेल्या या खास प्रयोगांचे डॉ. अब्दुल कलाम यांनी कौतुक केले होतं. अशी ही खास आठवणही टिळेकरांनी यावेळी सांगितली.

कलाविश्वातील कलाकारांच्या नखऱ्यांवर आणि उद्धटपणावर रोखठोक बोलणाऱ्या टिळेकरांनी डॉ. कलाम यांच्यासारख्या थोर व्यक्तीची साधेपणा आणि माणुसकी कशी मनाला भावून गेली, हे आवर्जून सांगितलं.