Headlines

एका फलंदाजाच्या 206 धावा, संघाच्या 417; टी-20 सामन्यात तब्बल 646 धावांचा पाऊस, षटकार तब्बल…


एका टी-20 सामन्यात धावांचा अक्षरशः महापूर आला. मात्र, या सामन्याची खरी चर्चा केवळ धावांपुरती मर्यादित नाही तर या सामन्यामध्ये खेळाडूंनी अनेक विक्रमही केले आहेत. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

55 balls 206 runs ewan gegg dumbleton club 417 runs highest total in t20 club cricket england
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एका टी20 क्लब क्रिकेट सामन्याने क्रिकेटविश्वाला अक्षरशः थक्क करून सोडलं. डंबलटन क्रिकेट क्लबच्या फलंदाज विरोधी गोलंदाजांवर अशी तुटून पडले की धावफलकावर तब्बल 417 धावा झळकल्या. या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला इव्हान गेग . त्याने केवळ 55 चेंडूत नाबाद 206 धावांची वादळी खेळी करत पुरुष क्लब टी20 क्रिकेटमधील विक्रमांमध्ये नवा झेंडा रोवला.

30 चेंडूत शतक, पुढच्या 24 चेंडूत द्विशतक

इव्हान गेगने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमणाची भूमिका घेतली. अवघ्या 30 चेंडूत त्याने शतक झळकावलं आणि त्यानंतर पुढील 24 चेंडूंमध्ये आणखी 100 धावा फटकावत द्विशतक पूर्ण केलं. त्याच्या नाबाद 206 धावांच्या खेळीत 23 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. हैथर्ली अँड रेडिंग्स सीसीचे गोलंदाज त्याच्यासमोर पूर्णपणे फेल ठरले.

417 धावांचा डोंगर; 47 षटकारांची आतषबाजी

इव्हानच्या तुफानी खेळीला डॅन हॉलंड आणि थॉमस केली यांनीही तितकीच प्रभावी साथ दिली. हॉलंडने 37 चेंडूत 122 धावा ठोकल्या, तर केलीने 25 चेंडूत 64 धावांचे योगदान दिले. त्यामुळे डंबलटनने 20 षटकांत केवळ 2 बाद 417 धावांचा प्रचंड स्कोअर उभारला. संपूर्ण डावात संघाने 20.85च्या सरासरीने धावा बनवल्या.

या डावात तब्बल 69 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. त्यात 22 चौकार आणि विक्रमी 47 षटकारांचा समावेश होता. डंबलटन क्लबच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर 417 धावांचा हा स्कोअर पुरुष क्लब टी20 लीगच्या इतिहासातील सर्वोच्च स्कोअर असल्याचा दावा केला आहे.

Maharashtra Times‘तू मला लाईक करतोस’ म्हणत चाहतीने श्रेयसला अडवलं; मागे उभ्या वैभवने जे केलं त्याचीच चर्चा

पराभव झाला, पण प्रतिस्पर्ध्यानेही हार मानली नाही

418 धावांचं अशक्यप्राय लक्ष्य समोर असतानाही हैथर्ली अँड रेडिंग्स सीसीने झुंज सोडली नाही. संघाने आक्रमक फलंदाजी करत 229 धावा उभारल्या. अखेर त्यांना 188 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघांनी मिळून केवळ 39.1 षटकांत तब्बल 646 धावा केल्या. चौकार-षटकारांच्या या वर्षावामुळे हा सामना क्लब क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा आणि दीर्घकाळ चर्चेत राहणारा सामना ठरला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा