30 मुलींच्या लैंगिक शोषणाचा गुन्हेगार
वृत्तसंस्था/लंडन
ब्रिटन आणि पाकिस्तान यांच्यात एका लैंगिक गुन्हेगारावरुन वाद पेटला आहे. शाबिर अहमद ब्रिटनच्या कुख्यात ग्रूमिंग गँगशी संबंधित असून त्याला 30 मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. शाबिर हा मूळचा पाकिस्तानचा रहिवासी असला तरीही त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. आता ब्रिटन शाबिरला पाकिस्तानात परत पाठवू इच्छितो, परंतु पाकिस्तानने त्याला स्वीकारण्यास नकार दिला आहे. शाबिरला स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आल्यास अवैध स्थलांतरितांना परत घेणे, सुरक्षा सहकार्य आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण यासारख्या मुद्द्यांवर पुनर्विचार करू शकतो असा इशारा पाकिस्तानने ब्रिटनला दिला आहे.
शाबिर अहमद कोण?
73 वर्षीय शाबिर अहमद हा मूळचा पाकिस्तानी असून मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी त्याला 22 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने सुमारे 14 वर्षे तुरुंगात काढली असून अलिकडेच तो मुक्त झाला आहे. ब्रिटनने त्याचे नागरिकत्व समाप्त केले असून त्याला आता पाकिस्तानात पाठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाबिरने स्वत:चे बहुतांश आयुष्य ब्रिटनमध्ये घालविले आहे, त्याचे पालनपोषण तेथेच झाले आहे आणि त्याने ब्रिटनमध्येच गुन्हे केले असल्याने त्याची जबाबदारी ब्रिटननेच उचलावी असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
व्हिसा निर्बंध
पाकिस्तानने शाबिर अहमदला स्वीकारण्यास नकार दिल्यास ब्रिटन सरकार पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाकरता कठोर धोरण लागू करू शकते. तसेच पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात घट करण्याचा विचारही सरकारसमोर आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. व्हिसा अन् आर्थिक मदतीला दबावासाठी वापरण्यात आल्यास दोन्ही देशांच्या संबंधांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो असे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
