Headlines

आशिष यादवला भालाफेकमध्ये रौप्य


यू 20 वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानंतर पदक जिंकणारा दुसरा भारतीय

वृत्तसंस्था

ओरेगॉन (अमेरिका)

अमेरिकेतील युजीन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या दिवशी भारताचा युवा अॅथलिट आशिष यादवने पुरुष भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. विशेष म्हणजे, नीरज चोप्राने 2016 मध्ये या स्पर्धेत भारतासाठी भालाफेकमध्ये पहिलं पदक जिंकल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी हा पराक्रम करणारा आशिष दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. आशिषने तिसऱ्या फेरीत 74.09 मीटर भाला फेकला. याशिवाय, दुसरा भारतीय टी. धरनिधरन 72.35 मीटरच्या फेकसह सहाव्या स्थानावर राहिला.

उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या आशिषने या स्पर्धेत शानदार कामगिरी साकारली. पात्रता फेरीत त्याने 69.07 मी. भालाफेक करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. यानंतर, अंतिम फेरीत मात्र तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिक हेयमन्सने 80.50 मीटर फेकीसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर डॉमिनिकाच्या अॅडिसन जेम्सने 73.89 मीटर फेक करत कांस्यपदक जिंकले. आशिषने 74.09 मीटरची सर्वोत्तम फेक करत दुसरे स्थान मिळवले.

अर्थात, युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणे हे आशिषसाठी सोपे नव्हते. फायनलमध्ये त्याने पहिल्या प्रयत्नात 69.96 मीटर फेक केली, तर दुसरा प्रयत्न फाऊल ठरला. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने शानदार पुनरागमन करत भाला 74.09 मीटरपर्यंत फेकला आणि थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. यानंतर  चौथ्या प्रयत्नात 72.31 मीटर, पाचव्या प्रयत्नात 70.62 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 67.98 मीटर असा भाला फेकला. 74.09 मी. भालाफेकसह त्याने रौप्यपदकाला गवसणी घातली. अर्थात, ही कामगिरी देखील त्याच्यासाठी अतिशय खास ठरली. या रौप्यपदकासह वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरजनंतर पदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत