सावंतवाडी: प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून के. एल. ई. विद्यापीठ संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर बेळगाव, प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी २० जुलै रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तब्बल २१ आजारांवर मोफत उपचार तसेच शस्त्रक्रियाही केली जाणार असून, या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले.
श्री. परब यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य कवठणकर, महिला जिल्हाप्रमुख ऍड. निता कविटकर, नगरसेविका सायली दुभाषी, स्नेहा नाईक, नगरसेवक देव्या सुर्याजी, भारती मोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संजू परब म्हणाले की, आमदार केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण सप्ताहभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाआरोग्य शिबिर हे २० जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी होणार आहे. या शिबिराला विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून मोफत उपचार व शस्त्रक्रियाही यामध्ये होणार आहेत. या शिबिरामध्ये प्रामुख्याने हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, पचन संस्था व पोटाचे रोग, फिजिओथेरपी, स्त्रीरोग व प्रसुती, नेत्ररोग, ईसीजी, मेंदू व मध्य संस्था शस्त्रक्रिया, छाती व श्वसन रोग, कान-नाक-घसा, कर्करोग तपासणी, बालरोग, त्वचारोग, टू-डी इको आणि मधुमेह अशा विविध २१ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत. त्यामुळे या शिबिराचा गरजूंनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाआरोग्य शिबिरासोबतच १८ जुलै रोजी सकाळी आमदार केसरकर यांच्या कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्यानंतर तिन्ही तालुक्यांतील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्ण व गरजूंना फळ वाटप, रक्तदाता संघटना सावंतवाडीच्या वतीने रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आणि गरीब जनतेला धान्य वाटप केले जाईल. तसेच १९ जुलै रोजी खास कबड्डी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.
महिला जिल्हाध्यक्ष ऍड. निता कविटकर यांनी सांगितले की, तिन्ही तालुक्यांमध्ये महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फळ वाटप, छत्री वाटप व अन्य विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार केसरकर यांचा वाढदिवस या दिवशी केवळ सामाजिक उपक्रमांनीच साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
