![]()
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौघुले यांनी फेसबुकवर भावनिक आणि संतप्त पोस्ट लिहित विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भूमिका मांडली आहे. तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत त्यांनी समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेवरही बोट ठेवले आहे. समीर चौघुले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे,” अशा आशयाची पोस्ट वाचून आपण सुन्न झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपण माणसं राहिलो नाही, झोंबी झालो आहोत समीर चौघुले यांनी लिहिलं, “आपण माणसं राहिलो नाही… झोंबी झालो आहोत. हा कोणता उन्माद आपल्या डोक्यात भरलाय?” विद्यार्थ्यांची डोकी फुटतानाचे व्हिडिओ पाहून जर कोणाला आनंद होत असेल किंवा अशा क्लिप्स पाहून समाधान वाटत असेल, तर हा समाज गंभीर आजाराने ग्रासल्यासारखा असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांनी पुढे स्पष्टपणे म्हटलं की, प्रत्येक प्रश्न संवादातून सोडवता येतो. चर्चा व्हायला हवी होती. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्यांना प्राधान्य दिलंच पाहिजे. ट्रोलर्सनाही दिलं सडेतोड उत्तर समीर चौघुले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ट्रोलर्सनाही स्पष्ट शब्दांत सुनावलं. कलाकारांनी सामाजिक विषयांवर बोलू नये, अशा टीकांना उत्तर देताना त्यांनी म्हटलं, “मीही तुमच्यासारखाच या देशाचा नागरिक आहे. तुम्ही जसं मत मांडता, तसंच मीही मांडणार.” पहलगाम घटनेच्या वेळीही आपण भूमिका घेतली होती, त्यामुळे निवडक विषयांवर बोलतो, असा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, “अनफॉलो करायचं असेल तर शांतपणे करा, त्याची घोषणा करण्याची गरज नाही,” असा टोला त्यांनी ट्रोलर्सना लगावला. शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना त्यांनी संयम राखण्याचं आवाहन केलं. “या पोस्टसाठी किती पैसे मिळाले?” या प्रश्नावरही त्यांनी मिश्कील उत्तर देत लिहिलं, “तुम्हाला मिळतात त्यापेक्षा थोडे जास्त.” विद्यार्थी आंदोलनाला सेलिब्रिटींचा पाठिंबा वाढतोय नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेल्या आंदोलनाला अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. शबाना आझमी, प्रकाश राज, रितेश देशमुख, प्रीती झिंटा, सोनू सूद, स्वरा भास्कर, सोनाक्षी सिन्हा, अरमान मलिक यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. देशभरात सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई, पेपरफुटीचा मुद्दा आणि त्यावरून रंगलेलं राजकारण यामुळे वातावरण आणखी तापलं असून, या विषयावर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. हेही वाचा… वंचित बहुजन आघाडीचा आज ‘महाराष्ट्र बंद’:कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सविस्तर वाचा जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. ही झटापट सुमारे 15 मिनिटे चालली. त्यानंतर परिस्थिती सामान्य आहे. सविस्तर वाचा
Source link
आपण माणसं राहिलो नाही, झोंबी झालो आहोत:विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर अभिनेता समीर चौघुले संतापले, ट्रोलर्सनाही सुनावलं
