Headlines

अंजनगाव बारीत घरकुल स्थलांतरास रहिवाशांचा तीव्र विरोध:भारतीय महिला मुक्ती मोर्चाने ग्रामपंचायतीला दिले निवेदन




अंजनगाव बारी येथील बजरंगनगर वस्तीतील रहिवाशांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ आहे त्याच ठिकाणी मिळावा, अशी मागणी भारतीय महिला मुक्ती मोर्चाने केली आहे. घरकुलासाठी अन्यत्र स्थलांतर करण्याच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेला रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. बजरंगनगर वस्ती सुमारे १५ वर्षांपूर्वी वसलेली असून, तेव्हापासून येथील नागरिक याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीमार्फतच या रहिवाशांना जागेची मोजणी करून देण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांनी येथे पक्की घरे बांधली आहेत. या वस्तीसाठी ग्रामपंचायतीने घरटॅक्स आकारणी, ८-अ उतारे, नळजोडणी आणि वीजजोडणी यांसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे या वस्तीला प्रशासकीय मान्यता असल्याचे स्पष्ट होते. आता मात्र, घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रहिवाशांना अचानक अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगितले जात आहे. या अचानक आलेल्या मागणीमुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य असल्याने त्यांचे दैनंदिन व्यवहार, व्यवसाय, उदीम आणि रोजगार या भागाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे स्थलांतर केल्यास त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय महिला मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक खरात आणि राष्ट्रीय सरचिटणीस संगीताताई वाघ यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनात, बजरंगनगरातील रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी स्थायिक करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना बजरंगनगरातील नागरिक, महिला आणि परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. दरम्यान, पक्क्या घरांची नुकसानभरपाई न देता रहिवाशांना जागा सोडण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. स्थलांतर न केल्यास घरकुल योजनेसाठी मंजूर झालेला दावा रद्द होईल आणि मिळालेला हप्ताही परत करावा लागेल, अशी भीती प्रशासनाकडून नागरिकांना दाखवली जात असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत