व्हेनेझुएला येथे मृत्यू पावलेले खलाशी राकेश चौहान यांच्या पत्नीने आपल्या पतीची हत्या करुन त्याचे अवयव काढल्याचे गंभीर आरोप केले आहे. चौहान यांच्या पत्नीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
चौहान यांच्या पत्नी रंजना यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली असून त्यांचे अवयव काढून घेण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, त्यांनी असाही आरोप केला आहे की, कंपनीचे प्रतिनिधी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता टाळाटाळ करत होते आणि वारंवार विनंती करूनही उत्तरे देण्यास तयार नव्हते .
“माझे पती जहाजावर कामाला गेले होते; तिथेच त्यांची हत्या झाली आणि त्यांचे अवयव काढून घेण्यात आले. आम्ही वारंवार विनंती करूनही, आजपर्यंत त्यांनी आम्हाला योग्य अहवाल दिलेला नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वस्तूही परत केल्या नाहीत; ते आमच्याशी नीट बोलतही नव्हते; कंपनीचे प्रतिनिधी आम्हाला तुच्छ लेखत होते,” असे त्या म्हणाल्या.
काराकासमधील भारतीय दूतावासाने २२ मे रोजी जारी केलेल्या प्रमाणपत्रानुसार, चौहान यांचा ७ मे रोजी फाल्कन राज्यातील पुंटो फिहो येथे मृत्यू झाला.
हे सुद्धा वाचा |Mumbai News | मुंबईत मॅनहोलचा आणखी एक बळी! साकीनाकात उघड्या मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू;
शरीरात एकही अवयव नव्हता
रंजना म्हणाल्या की, कुटुंब केवळ चौहान यांचा मृतदेह परत मिळण्याची वाट पाहत होते, परंतु भारतात करण्यात आलेल्या दुसऱ्या शवविच्छेदनाने चिंताजनक प्रश्न निर्माण केले आहेत.
“आम्ही फक्त मृतदेह येण्याची वाट पाहत होतो. जेव्हा आम्ही इथे दुसरे शवविच्छेदन केले, तेव्हा अहवालात उघड झाले की शरीरात एकही अवयव शिल्लक राहिला नव्हता,” असे चौहान यांच्या पत्नी म्हणाल्या.
धक्कादायक माहिती देताना पुढे त्या म्हणाल्या “आम्ही दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालय आणि इतर संबंधित प्राधिकरणांकडे, सर्वत्र तक्रारी दाखल केल्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही… मी माझ्या पतीशी शेवटचे ६ मे रोजी बोलले होते… मला वाटते, तो ड्युटीवर निघून गेल्यानंतर दोन-तीन तासांनी माझ्या सासऱ्यांना फोन आला की अपघात झाला आहे आणि त्यांना रुग्णालयात नेले जात आहे,”.
एफएसयूआयचे निवेदन
फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाने (FSUI) असाही आरोप केला आहे की, भारतात शवविच्छेदन केले असता चौहान यांच्या शरीरात कोणतेही अंतर्गत अवयव आढळले नाहीत.
युनियनच्या म्हणण्यानुसार, मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुसे, मूत्रपिंडे, यकृत, प्लीहा, स्वादुपिंड, जठर, आतडे, थायरॉईड, हायॉइड, स्वरयंत्र आणि श्वासनलिका हे सर्व अवयव गायब होते असे सांगण्यात आले.
The family of late Indian seafarer #RakeshChauhan is demanding the full autopsy report and immediate clarification on several deeply disturbing irregularities in the handling of his case in Venezuela.
Serious questions that need answers:
• Why were vital organs removed from his… pic.twitter.com/9sfCm5kb9A— FSUI (@FSUIINDIA) July 1, 2026
एका निवेदनात संघटनेने म्हटले आहे: “धक्कादायक प्रकरण — भारतीय खलाशी राकेश चौहान व्हेनेझुएलामध्ये मृत झाल्याचे वृत्त आहे. व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही शवविच्छेदन अहवाल किंवा तपशील न देता मृतदेह उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यात आला. कुटुंबीयांनी पुन्हा शवविच्छेदनाची मागणी केली. भारतात करण्यात आलेल्या अधिकृत शवविच्छेदन अहवालातून एक भयानक सत्य समोर आले आहे: मृतदेहात एकही अवयव आढळला नाही.”
एफएसयूआयने व्हेनेझुएलामधील भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. तसेच, चौहान यांच्या पार्थिवाबरोबर असलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“पार्थिवाची पावती बनावट होती — त्यावर (त्यांच्या पत्नीच्या वतीने) ‘रंजना चौरसिया’ ऐवजी ‘अंजना चौरसिया’ यांच्या नावाने सही करण्यात आली होती. रोजगार करारामध्ये नमूद केलेले जहाजाचे नाव आणि त्यांची प्रत्यक्ष नेमणूक ज्या जहाजावर झाली होती, ते नाव जुळत नाही,” असे त्यात म्हटले आहे.
