अहिरांच्या या अनपेक्षित धक्क्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना हे कळतं त्यांना बरोबर ही गोष्ट समजली आहे.
वरळीमधून सचिन अहिर भविष्यात तुमच्या विरोधातील उमेदवार असतील या का? या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर देत म्हटले ते विरोधी असले नसले तरी फरक पडत नाही, वाराणसीतही एका उमेदवाराला तीनदा मागे जायला लागलं त्यांनी मला माझ्याविरोधात वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही असा मेसेज सकाळी केला पण या बोलण्याच्या गोष्टी असतात.
आमचं कोलायट्रल डॅमेज
भाजपवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले “ज्या भाजपने राम मंदिरासाठी लोकांना रस्त्यावर उतरवलं, दंगली घडवल्या तोच भाजप आज राम मंदिर लूटत आहे. भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की पुन्हा एकदा उपसभापती पदी भाजपच्या कार्यकर्त्याला का संधी नाही मिळाली ज्यांनी २५ – ३० वर्षे घर-दार सोडून भाजपचा प्रचार केला त्यांना डावलून आज उपरे त्यांच्या डोक्यावर बसवले जात आहे याचा विचार भाजपने करावा” त्यामुळे हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि या सगळ्यात आमचं कोलायट्र्ल डॅमेज (उद्देश नसताना झालेलं नुकसान) झालं आहे. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत जी कारवाई असेल ती आम्ही करुच इतकी मोठी सत्ता मिळाली असतानाही तुम्हाला मोठ्या पदावर बसवण्यासाठी उपरेच का लागतात?”
आम्ही शब्द पाळणारे आहोत
पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही ज्यांना खासदार, आमदार, नगरसेवक या पदांसाठी शब्द दिले ते आम्ही पूर्ण केले आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत, आता तुम्ही निष्ठा पाळायची की नाही तो तुमचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाचे पंख छाटले जात आहेत या फडणविसांबाबत केलेल्या विधानाचा पुन्हा उल्लेख करत आदित्य ठाकरे म्हणाले नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्या बाबतीतही तेच झालं आजही मराठी माणसाच्या बाबतीत तेच होतंय.
संविधान बदलण्याचा डाव
भाजपला नुसती सत्ता नकोय तर त्यांना दोन तृतियांश बहुमत हवंय आणि याचा वापर करुन त्यांना देशाचं संविधान बदलायचं आहे असा थेट हल्ला यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपवर केला. चोराकडे चिन्ह आहे म्हणून ते योग्य म्हणायचं का? असा सवालही पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे सचिन अहिर कोण आहेत?
सचिन अहिर हे सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विजयात सचिन अहिर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती असे मानले जाते. मुंबईच्या राजकारणात सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जात होते. आतापर्यंत महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे होत्या. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेने सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
