या कारवाईत ७३ हजार ८०० रुपयांचा गांजा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, कारवाई सुरू असताना गांजा खरेदीसाठी आलेले ८४ जण घटनास्थळी आढळले. त्यांचे समुपदेशन करून पुढील कारवाईसाठी फुरसुंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
स्वप्नील दयानंद गंधारे (वय २२) आणि प्रतीक बाळू गाडे (२२, रा. ओंकार कॉलनी, तुकाई दर्शन, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला जामिनावर असलेला आरोपी काही युवकांच्या मदतीने पुण्यातील विविध भागांत संघटित पद्धतीने गांजाविक्रीचे जाळे चालवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तुकाई टेकडी परिसरात सापळा रचण्यात आला.
Pune Crime : मेडिटेशन सेंटरमधील महिलेवर एकतर्फी प्रेम, घटस्फोटित पुरुषाने जागा मालकाला संपवलं, पुण्यातील बाणेरमध्ये थरकाप
या प्रकरणाचा तपास करताना आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची, गांजाच्या पुरवठा साखळीची; तसेच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर संशयितांची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास सुरू आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके आणि ‘अमली पदार्थविरोधी पथक-२’चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक व त्यांच्या पथकाने केली.
Pune Crime : शाळेपासून अफेअर, पुण्यात जाताच निकिता विसरली; संतप्त तरुणाने हिंजवडी गाठली, एक्सच्या प्रियकराला जीवानिशी संपवलं
रांजणगावात गांजा नष्ट
पुणे : अमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करून अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) गुरुवारी रांजणगाव येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि.मध्ये विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या ९,५६३ किलो गांजाची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली. नष्ट करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत १२ कोटी ४७ लाख ३० हजार ४५० रुपये आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘नशामुक्त भारत-२०२९’ अभियान आणि राज्य सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत ही कारवाई करण्यात आली. उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समितीमार्फत ३,१५१ किलो, तर घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल समितीमार्फत ६,३८५ किलो गांजा नष्ट करण्यात आला.
या वेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंह, पोलिस उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय देवरे; तसेच ‘एएनटीएफ’चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
‘एएनटीएफ’कडून राज्यभर अमली पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, विक्री व सेवन रोखण्यासाठी मोहिमा राबविण्यात येत आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जप्त अमली पदार्थांची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट होते. नागरिकांनी पोलिसांना अमली पदार्थांबाबतची माहिती कळवावी, असेे आवाहन केले आहे.

