Headlines

Natalie Harp: ट्रम्प यांची सावली, कारमध्ये जागा न मिळाल्यानं डिक्कीत उडी मारली; वादात सापडलेल्या नताली कोण?


कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय वर्तुळात असलेल्या नताली हार्प वादात सापडल्या आहेत. ह्युमन प्रिंटर अशी ओळख असलेल्या हार्प ट्रम्प यांच्या सोबत सावलीसारख्या असतात.

trump and natalie
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन: गेल्या महिन्यात नाटोच्या समीटसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तुर्कीला गेले होते. तेव्हा इराणकडून हल्ला होण्याच्या भितीनं ट्रम्प यांना एअर फोर्स वन विमानाऐवजी लष्करी विमानानं अमेरिकेला रवाना करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्यासोबत अतिशय मोजके लोक होते. त्यात नताली हार्प यांचाही समावेश होता. जॉर्जियाचे खासदार जॉन ओसॉफ यांनी या संवेदनशील मोहिमेतील नताली हार्प यांच्या उपस्थितीबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे ट्रम्प आणि नताली यांच्या नात्यावरून वादंग निर्माण झाला आहे.

३५ वर्षांच्या नताली हार्प या ट्रम्प यांच्या कार्यकारी सहाय्यक आहेत. त्यांचा समावेश ट्रम्प यांच्या निकटवर्तीय वर्तुळात होतो. हार्प याआधी टीव्ही अँकर राहिल्या आहेत. त्या ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील बऱ्याच बैठकांना हजर असतात. अमेरिकेच्या अध्यक्षांचं सोशल मिडिया अकाऊंट हँडल करण्यात त्या मदत करतात. हार्प कायम त्यांच्या सोबत पोर्टेबल प्रिंटर घेऊन फिरतात. ट्रम्प यांना वाचण्यासाठी त्या लेख, बातम्यांच्या प्रिंट त्या काढून देतात. ट्रम्प यांना डिजिटल स्क्रीनवर वाचन करणं आवडत नाही. त्यामुळेच हार्प स्वत: सोबत प्रिंटर ठेवतात. त्यामुळेच त्यांना ह्युमन प्रिंटरही म्हटलं जातं.

harp

कॅलिफोर्नियाच्या रहिवासी असलेल्या हार्प कोणत्याही घटनात्मक पदावर नाहीत. तरीही त्या ट्रम्प यांच्या निकटवर्तीय आहेत. त्यांनी पॉईंट लोमा नजारिन विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. यानंतर त्यांनी लिबर्टी विद्यापीठातून एमबीए केलं. २०१९ मध्ये त्यांना हाडांचा कर्करोग झाला होता. ट्रम्प यांच्या राईट टू ट्राय कायद्याचं हार्प यांनी कौतुक केलं होतं. याच कायद्यामुळे आपला जीव वाचल्याचं त्या जाहीरपणे म्हणाल्या होत्या. तुम्ही नसतात, तर आज मी जिवंत नसते, अशा शब्दांत त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले होते.

harp

नताली हार्प २०२२ पासून ट्रम्प यांच्या कायमस्वरुपी टीमचा भाग आहेत. ट्रम्प यांच्या जवळ जाण्यासाठी नताली कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात, असं निरीक्षण चरित्रकार मायकल वोल्फ यांनी नोंदवलं. ‘जेव्हा त्यांना न्यू जर्सीमध्ये थांबण्यासाठी जागा मिळाली नाही, तेव्हा त्या लॉकर रुममध्ये बिछाना टाकून झोपल्या होत्या. एकदा तर त्यांना कोर्टात जात असताना वाहनांच्या ताफ्यात जागा मिळाली नाही, तेव्हा त्यांनी एका एसयूव्हीच्या डिक्कीत उडी मारली होती,’ अशा घटना वोल्फ यांनी सांगितल्या.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा