जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना इथ घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत त्यांनी सरकार मराठा समाजाविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला. माझ्या अंगावर येऊ नका, नाहीतर अवघड होईल, असा इशारा देतानाच त्यांनी सरकार मराठा समाजाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसी (कुणबी) प्रमाणपत्र सरकारनेच दिले आणि आता राजकीय द्वेषातून त्याच प्रमाणपत्रांची रद्दबातल प्रक्रिया सुरू केली आहे. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने होत असून त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या तीन वर्षांत प्रथमच आपण एकनाथ शिंदे यांचे नाव घेत असल्याचे सांगत त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांनी मराठा समाजाचे “पानिपत” केल्याचा आरोप केला.
ज्योती दहीहंडे यांच्या कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणाचा उल्लेख करत जरांगे यांनी यशवंता दहीहंडे यांची उर्दूतील नोंद तसेच शिंदे समितीने ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लावलेल्या नोंदींचा संदर्भ दिला. दहीहंडे आडनावाचे हजारो लोक राज्यात आहेत, मग राजकारणासाठी त्या सर्वांना फासावर लटकवणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी नोंद रद्द करण्यात आली तेथे सत्ताधारी पक्षाचा उमेदवार निवडून आला नव्हता, त्यामुळे राजकीय दबावातून ही कारवाई झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
फडणवीस यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हाताशी धरून मराठा समाजाचे नुकसान केल्याचा आरोप करत, तुम्हाला बावनकुळे पाहिजे की मराठे पाहिजेत? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. मी राजकारण करत नाही, मी मराठा समाजासाठी लढतो, असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदे यांच्यावरही मनोज जरांगेंनी टीका करत मराठा आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप केला. मराठा आरक्षणाला विरोध करणारे लोक उपमुख्यमंत्री कार्यालयात कसे पोहोचतात, असा सवाल करत शिंदे साहेब, तुम्ही आमच्यासोबत डबल गेम खेळत आहात का? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. यावेळी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. संजय शिरसाट यांच्या बंगल्यात माझ्याविरोधात बैठका घेण्यात आल्या. सरकारच्या आदेशावरून आपल्याविरोधात विविध समाजातील लोकांना उभे करून आंदोलने घडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा समाजाला आवाहन करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजात गैरसमज निर्माण होऊ देऊ नयेत, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. तसंच 2016 मधील पोलीस भरतीसह विविध भरती प्रक्रियांमध्ये मराठा समाजावर अन्याय झाल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यांनी मराठा समाजाचा समन्वयक आणि अभ्यासक यांना सुद्धा आवाहन केले आहे की तुम्ही समाजाच्या मुद्यावर बोला, मात्र तुम्ही वैयक्तिक माझ्यावर बोलू नका, असं ते म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा