Headlines

Heavy rain in mumbai local halted cm devendra fadnavis important appeal to citizens; मुंबईत पावसाचा धुमाकूळ; लोकल वाहतूक विस्कळीत, दुपारनंतर आणखी गंभीर स्थिती, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन


Mumbai Local Updates: मुंबई शहरात मुसळधार पाऊस कोसळत असून हवामान विभागाने शहर आणि परिसराला रेड अलर्ट जारी केल्याने स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

mumbai rain
मुंबईत पावसाचा धुमाकूळ; लोकल वाहतूक विस्कळीत, दुपारनंतर आणखी गंभीर स्थिती(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबई शहर आणि परिसरात मागील काही तासांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. अशातच काही वेळापूर्वी कांजूरमार्ग आणि भांडूप स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला प्लास्टिक अडकल्यामुळे या दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायरवरील प्लास्टिक हटवण्याचं काम सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या परिसरात पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची स्थिती पाहता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच शासकीय आणि निमशासकीय (अत्यावश्यक सेवा वगळून) कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन

मुंबई शहरासह परिसरात कोसळत असल्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. “राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये. प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि सतर्कतेच्या निर्देशांचे पालन करावे. दुपारी यापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सगळ्यांनी पूर्णतः प्रवास आणि घराबाहेर पडण्याचे टाळावं,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

महापालिकेनेही दिल्या सूचना

हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केलं आहे. “अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा,” असं आवाहन पालिकेने केलं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा