Flight Accident Averted: विमानानं उड्डाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा विमानाचा वेग दोनदा कमी झाला. धावपट्टी संपत आलेली असताना विमान हवेत झेपावलं. पण त्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे संकेत मिळू लागले. विमान माघारी वळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बर्लिन: जर्मनीच्या म्युनिक विमानतळावर व्हिएतनाम एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात अगदी थोडक्यात टळला. व्हिएतनामच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या अहवालानुसार, बोईंग ७८७-९ विमान उड्डाण करत असताना त्याचा वेग दोनदा कमी झाला. दुसऱ्यांदा वेग कमी झाला तेव्हा विमानानं धावपट्टीचा बराचसा भाग पार केला होता. यानंतरही वैमानिकांनी टेकऑफ केलं. धावपट्टीचा केवळ ९१ मीटर भाग शिल्लक असताना विमान हवेत झेपावलं आणि मोठा अनर्थ टळला.
१५ ऑगस्टला घडलेल्या घटनेची माहिती व्हिएतनामच्या नागरी उड्डाण प्राधिकरणानं दिली आहे. हनोईला निघालेल्या व्हिएतनाम एअरलाईन्सच्या VN३४ विमानानं स्थानिक वेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता उड्डाण केलं. विमानात २७१ प्रवासी आणि १६ कर्मचारी होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक समस्या असल्याचे संकेत मिळाले. त्यामुळे वैमानिकांनी माघारी वळण्याचा निर्णय घेतला.
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, विमानानं म्युनिक विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २६L चं अर्ध्याहून अधिक अंतर कापलं, तेव्हा २ सेकंदांसाठी विमानाचा वेग वाढणं बंद झालं. यानंतर विमानानं पुन्हा वेग घेतला आणि V१ वेग मर्यादा गाठली. ही निर्णायक गती असते. यानंतर उड्डाण रोखणं अतिशय जोखमीचं असतं.
यानंतर काही वेळातच विमानाचा वेग पुन्हा घटल्याचं वैमानिकांच्या लक्षात आलं. त्यावेळी धावपट्टी जवळपास संपत आलेली होती. वैमानिकांनी इंजन थ्रस्ट कमाल मर्यादेपर्यंत नेला आणि टेकऑफ कायम ठेवलं. धावपट्टीचा जवळपास ९१ मीटर इतकाच भाग राहिलेला असताना विमानाचा पुढील भाग हवेत झेपावला आणि बोईंग ७८७-९ नं धावपट्टी सोडली.
उड्डाण केल्यानंतर विमानाच्या संभाव्य टेल स्ट्राईक आणि टायर प्रेशर कमी असल्याचे संकेत मिळाले. याची माहिती क्रूनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. यानंतर विमान माघारी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी विमान ९००० फूट उंचीवप होतं. सुरक्षित लँडिंगसाठी वजन कमी करण्याची आवश्यकता असल्यानं वैमानिकांनी इंधन सांडवण्यास सुरुवात केली. विमान एक तासापेक्षा अधिक वेळ विमानतळाच्या आसपास घिरट्या घालत होतं.
स्थानिक वेळेनुसार विमानानं दुपारी ३ वाजून ५७ मिनिटांनी लँडिंग केलं. टेकऑफ ते लँडिंगपर्यंतचा घटनाक्रम २ तास चालला. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, विमानाचे आठ मुख्य लँडिंग गियर टायरपैकी चार टायर फुटले. यातील तीन टायर डाव्या बाजूचे, तर एक टायर उजव्या बाजूचा होता. विमानाच्या मागच्या भागात मोठे ओरखडे उमटले असल्याचं दिसून आलं. विमानाचं शेपूट उड्डाणावेळी धावपट्टीला घासल्याची दाट शक्यता आहे. सुदैवानं २७१ प्रवासी आणि १६ सदस्य सुरक्षित आहेत.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा