Headlines

Boy Dies On Cricket Ground: क्रिकेटचं मैदान, मुलांची मस्ती अन् 750 किलोचा रोलर; चिमुकल्याचा वेदनादायी शेवट, कुटुंब धक्क्यात


मोठ्या भावासोबत क्रिकेट अकादमीत गलेल्या मुलाचा करुण अंत झाला. मैदानात सुरू असलेली मुलांची मस्ती आकाशच्या जीवावर बेतली. आकाशच्या निधनानं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

boy dies on ground
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गुरुग्राम: हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. क्रिकेटच्या मैदानात रोलर खाली चिरडून ८ वर्षीय मुलाचा शेवट झाला आहे. आयएमटी मानेसर येथील क्रिकेट अकादमीत हा दुर्दैवी प्रकार घडला. ७५० किलोच्या रोलर खाली आल्यानं मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आकाश कुमार असं मृत मुलाचं नाव आहे. तो मूळचा बिहारच्या नालंदा जिल्ह्याचा रहिवासी आहे. आकाश त्याच्या कुटुंबासह गुरुग्रामध्ये राहायचा. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. आकाश त्याचा मोठा भाऊ नील आणि अन्य दोन मुलांसह क्रिकेट अकादमीत होता. तेव्हा काही मुलं रोलरवर चढली. मैदान सपाट करण्यासाठी अकादमीत या रोलरचा वापर व्हायचा. रोलरवर चढलेल्या मुलांपैकी एकानं चुकून मिनिएचर सर्किट ब्रेकरचा (MCB) स्विच ऑन केला. यानंतर रोलर मागे-पुढे जाऊ लागला.

रोलरवर बसलेली मुलं तो मागे-पुढे करत होती. त्यांची ही मस्ती आकाशच्या जीवावर बेतली. आकाश खेळता खेळता रोलरच्या समोर पडला. पुढच्या काही सेकंदांत तो रोलरच्या खाली आला. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याची अवस्था पाहून रोलरवरील मुलं पळून गेली. काही वेळानंतर अकादमीत आलेल्या खेळाडूंनी आकाशला जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेलं पाहिलं. त्यांनी आकाशला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केलं.

आकाशचे मामा विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेची माहिती आकाशचा चुलत भाऊ नीलनं कुटुंबाला दिली होती. आकाश जखमी असल्याचं त्यानं कुटुंबाला आधी कळवलं होतं. आकाशच्या मृत्यूची माहिती कुटुंबाला तासाभरानं मिळाली. आकाशच्या मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आकाशच्या कुटुंबाला या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही. गुरुग्राम पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी संदीप तुरान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ च्या अंतर्गत तपास केला जात आहे. कुटुंबानं बेजबाबदारपणा किंवा कोणत्याही प्रकारच्या कटाचा संशय व्यक्त केलेला नाही.