Headlines

आयसीसीच्या सर्वोच्च पुरस्काराला ज्यांचं नाव त्या ‘सर गॅरी सोबर्स’ यांचे निधन, क्रिकेटविश्व हळहळले


Sir Garfield Sobers Death News : क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू आणि वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने जागतिक क्रिकेटवर शोककळा पसरली आहे.

Garfield Sobers Death
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू म्हणून ओळख असलेले वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर गारफिल्ड उर्फ गॅरी सोबर्स यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. वाढत्या वयांमुळे निर्माण झालेल्या आजारांमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 28 जुलै 2026 रोजी ते 90 वर्षांचे होणार होते, मात्र वाढदिवसाच्या अवघ्या 11 दिवस आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. बार्बाडोसमधून आलेल्या सोबर्स यांनी जवळपास दोन दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत त्यांनी केलेली कामगिरी आजही क्रिकेटविश्वासाठी आदर्श मानली जाते.

महान अष्टपैलू म्हणून वेगळी ओळख

28 जुलै 1936 रोजी बार्बाडोसच्या सेंट मायकेल येथे जन्मलेल्या सोबर्स यांनी 1952 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर 1954 मध्ये वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. डावखुरे फलंदाज, डावखुरे वेगवान तसेच फिरकी गोलंदाज अशी त्यांची बहुआयामी ओळख होती. 1965 ते 1972 या काळात त्यांनी वेस्ट इंडिजचे नेतृत्व केले आणि 39 कसोटींमध्ये संघाचे कर्णधारपद भूषवले. कार्डिफमध्ये काउंटी सामन्यात एका षटकात सलग सहा षटकार ठोकणारे ते क्रिकेट इतिहासातील पहिले फलंदाज ठरले होते.

Maharashtra TimesManjot Kalra Arrest : शुभमन गिलबरोबर मैदान गाजवणाऱ्या फलंदाजाविरुद्ध तीन खेळाडूंची तक्रार, श्रीलंकन पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय?

आयसीसीच्या सर्वोच्च पुरस्कारालाही त्यांचे नाव

सर गारफिल्ड सोबर्स यांच्या योगदानाचा गौरव म्हणून आयसीसीने आपल्या वार्षिक सर्वोच्च वार्षिक पुरस्काराला ‘सर गारफिल्ड सोबर्स क्रिकेटर ऑफ द इयर‘ ( Sir Garfield Sobers Trophy) असे नाव दिले आहे. एखाद्या खेळाडूच्या नावाने सर्वोच्च पुरस्कार देण्यात येणे, हे त्यांच्या महानतेचे सर्वात मोठे उदाहरण मानले जाते. त्यांच्या निधनानंतर जगभरातील माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Maharashtra TimesRohit Sharma Retirement : रिटायरमेंटच्या चर्चांमुळे रोहित इंग्लंडविरुद्ध दबावात खेळतोय? टीम इंडियाचे बॅटिंग कोच नेमकं काय म्हणाले?

महानतेची साक्ष देणारी आकडेवारी

सोबर्स यांनी 93 कसोटी सामन्यांत 57.78 च्या सरासरीने 8032 धावा केल्या. त्यात 26 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाज म्हणून त्यांनी 235 विकेट्स घेतल्या, तर क्षेत्ररक्षणात 109 झेल टिपले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 383 सामन्यांत 28,314 धावा, 86 शतके आणि 1,043 विकेट्स अशी अफाट कामगिरी केली. त्यांच्या या विक्रमांमुळेच सर गारफिल्ड सोबर्स यांचे नाव आजही क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान अष्टपैलूंच्या यादीत सर्वात वर घेतले जाते.