![]()
राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना विरोधकांकडून जाणीवपूर्वक महायुतीबद्दल अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ‘महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचे चेहरे बघायलाही तयार नाहीत, अशी वाईट स्थिती महायुतीमध्ये अजिबात नाही,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच, अयोध्येतील राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘निगेटिव्ह राजकारणाला महाराष्ट्र साथ देणार नाही’ विरोधकांच्या सततच्या टीकेवर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, “विरोधकांकडे आता केवळ आमच्यावर टीका करण्याशिवाय दुसरे काहीही काम शिल्लक राहिलेले नाही. सकारात्मक भूमिकेतूनच महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष वाढू शकतो आणि याच भूमिकेमुळे तुम्हाला राज्यात यश मिळू शकते. तुम्ही करत असलेल्या ‘निगेटिव्ह’ राजकारणाला महाराष्ट्र कधीही साथ देत नाही, हे विरोधी पक्षाला अजूनही समजलेले नाही, हे त्यांचे मोठे दुर्दैव आहे.” ‘व्होट बँक गेल्यावर भूमिका बदलली’ उद्धव ठाकरे यांच्याकडून रामरक्षा पठण आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकारणाचा बावनकुळे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, “आंदोलन करण्याचा विरोधकांना नक्कीच अधिकार आहे, पण मागील काळात त्यांनी प्रभू रामचंद्राच्या भक्तांबद्दल आणि राम मंदिराच्या भूमिकेबद्दल काय वक्तव्ये केली आहेत, ते आधी तपासून बघा. आता त्यांची व्होट बँक हातातून गेल्यामुळे त्यांनी आपली भूमिका बदलली आहे.” ‘भगव्याऐवजी पाकिस्तानचे झेंडे फडकवले’ ठाकरे गटाच्या हिंदुत्वावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करत बावनकुळे पुढे म्हणाले, “जेव्हा खऱ्या अर्थाने भगवे फडकवण्याची वेळ आली होती, तेव्हा तुम्ही पाकिस्तानचे झेंडे फडकवले. जेव्हा प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर करण्याची वेळ आली, तेव्हा तुम्ही केवळ विशिष्ट मतांचे लांगूलचालन केले. या आंदोलनांच्या पूर्वीच्या त्यांच्या भूमिका बघितल्या, तर यांनी कसे दुटप्पी राजकारण केले आहे, हे सर्वांना कळेल.” ‘राजकारणाचा अड्डा बनवण्याचा प्रयत्न’ “मुख्यमंत्री पदावर असताना यांची भूमिका वेगळी होती आणि आता सत्ता नसताना यांची भूमिका पूर्णपणे वेगळी झाली आहे. प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन केवळ आणि केवळ राजकारणाचा अड्डा बनवण्याचे काम सध्या त्यांच्याकडून सुरू आहे,” असा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. हेही वाचा.. ‘हिंदूंच्या श्रद्धेला तडा गेलाय, त्यांना ऊर्जा देण्याची गरज’:मोहन भागवतांना रामरक्षा आंदोनाचे निमंत्रण देत राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘रामरक्षा’ ही राज्यव्यापी चळवळ उभी केली आहे. या उपक्रमांतर्गत १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार संजय राऊत यांनी काल (१५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिले होते. त्यानंतर आता राऊत यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनाही पत्र लिहून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे ‘विशेष निमंत्रण’ दिले आहे. या पत्रातून राऊतांनी राम मंदिरातील चोरीवरून भाजप आणि प्रशासनावर सडकून टीका केली असून, संघालाही सूचक टोला लगावला आहे. सविस्तर वाचा..
Source link
भगवे फडकवण्याच्या वेळी तुम्ही पाकिस्तानचे झेंडे फडकवलेत:रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळे कडाडले
