Rohit Sharma Virat Kohli Failure : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा ११ आणि विराट कोहली ५ धावांवर बाद झाले. ६ महिन्यांनंतर एकत्र आलेल्या ‘रो-को’ जोडीने फॅन्सना निराश केले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबेस्टन, बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. जवळपास सहा महिन्यांनंतर मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी दोघांनाही स्वस्तात बाद करत भारताची सुरुवातच डळमळीत केली. रोहितने २१ चेंडूत ११ धावा केल्या, तर विराटला अवघ्या ६ चेंडूंचा सामना करता आला आणि तो ५ धावांवर माघारी परतला. दोन्ही अनुभवी फलंदाज लवकर बाद झाल्याने भारतीय डावावर सुरुवातीलाच दबाव निर्माण झाला.
रोहित लयीत दिसलाच नाही; मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न महागात
रोहित शर्माने आपल्या खेळीत एक आकर्षक चौकार लगावला. मात्र त्यानंतर तो संपूर्ण डावात सहजतेने फलंदाजी करताना दिसला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला सतत अचूक टप्प्यावर चेंडू टाकत बांधून ठेवले. २१ चेंडूंत केवळ ११ धावा करताना त्याचा स्ट्राइक रेट ५२.३८ इतकाच होता. सॅम करनच्या गोलंदाजीवर पुढे येत षटकार मारण्याचा प्रयत्न त्याच्यावर उलटला. चेंडू हवेत उंच गेला आणि हॅरी ब्रूकने सुरक्षित झेल घेत रोहितचा डाव संपवला.
आर्चरच्या वेगासमोर विराटची झुंज; अवघ्या ५ धावांत खेळी संपली
आयपीएलनंतर दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्याने जोफ्रा आर्चरच्या दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर आर्चरच्या वेगवान आणि आत येणाऱ्या चेंडूसमोर तो अडचणीत सापडला. आर्चरच्या चेंडूवर विराटच्या पॅडला चेंडू लागल्यानंतर इंग्लंडने जोरदार अपील केले आणि पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू बाद दिले. विराटने केवळ ६ चेंडूंमध्ये ५ धावा केल्या आणि भारताला दुसरा मोठा धक्का बसला.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसाठीही इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने या दोघांच्या फॉर्मकडे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाचे लक्ष आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा