Headlines

विद्यार्थ्यांच्या रोजगाराला बळ –  स. का. पाटील महाविद्यालयात ‘अंबिका कॉम्प्युटर्स’सोबत सामंजस्य करार!


मालवण, दि. १५ : स. का. पाटील सिंधुदुर्ग कला, वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय, मालवण आणि अंबिका कॉम्प्युटर्स, मालवण यांच्यात आज सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. या कराराअंतर्गत कौशल्याधारित संगणक प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), उद्योगाभिमुख अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप अशा विविध उपक्रमांचे संयुक्तपणे आयोजन करण्यात येणार आहे.

अंबिका कॉम्प्युटर्स ही टॅली आणि अॅडव्हान्स एक्सेल प्रशिक्षण क्षेत्रातील मालवणमधील अग्रगण्य संस्था असून, अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख संगणकीय कौशल्यांचे प्रशिक्षण देत आहे. या संस्थेच्या अनुभवाचा व तज्ज्ञतेचा लाभ या सामंजस्य करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते आणि अंबिका कॉम्प्युटर्सचे प्रोप्रायटर श्री. विद्याधर केनवडेकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी आयक्यूएसी समन्वयक प्रा. संग्रामसिंह पवार, डॉ. देविदास हारगिले, प्रा. रामचंद्र तावडे, प्रा. योगिता सावंत आणि डॉ. सुमेधा नाईक उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. विद्याधर केनवडेकर यांनी या सामंजस्य कराराअंतर्गत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी “AI for Commerce” हा पहिला कौशल्याधारित अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, टॅली आणि अॅडव्हान्स एक्सेल या विषयांवरील अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगक्षेत्राचा अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिपच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय कौशल्ये तसेच उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची संधी मिळणार असून, त्यामुळे येणाऱ्या काळातील तंत्रज्ञानाधारित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी अधिक सक्षम होतील, असे प्रतिपादन केले.

या सामंजस्य करारासाठी महाविद्यालयाच्या वतीने संपर्क समन्वयक (Point of Contact) म्हणून अकाऊंटन्सी विभागप्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कराराच्या माध्यमातून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक बळकट होऊन विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत