Headlines

‘ऑपरेशन टायगर’ थांबणार नाही!


– ‘मविआ’चे विद्यमान आमदारही संपर्कात – उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा

त. भा. प्रतिनिधी / रत्नागिरी :

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत देत ‘ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन वन, टू, थ्री’ इथेच थांबणार नाही. अजून अनेक मोठी ऑपरेशन्स व्हायची बाकी आहेत, असा खळबळजनक दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात होत असणारे प्रवेश ही निरंतर प्रक्रिया असल्याचे सांगत अनेक नगरसेवक, माजी आमदार, माजी खासदारांसह महाविकास आघाडीतील काही विद्यमान आमदारही आमच्या संपर्कात असून ते सोबत येण्यास तयार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी त्यांच्यावर कडाडून प्रहार केला. कन्हैया कुमार यांचे नाव जरी कन्हैया कुमार असले, तरी ते अजूनही अत्यंत अपरिपक्व, म्हणजेच ‘कुमार कन्हैयाच’ आहेत. केवळ भाषण करता येणे आणि कोणावरही टीका करण्याचा धंदा मांडणे योग्य नाही. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याआधी स्वत:च्या वयाचे भान ठेवावे. कन्हैया कुमारने आधी स्वत: ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे, असा टोला सामंत यांनी लगावला.

   16 व्या दिवशी पाठिंबा – उशिरा सुचलेले शहाणपण

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावर आणि नागपुरातील रामरक्षा पठणावर बोलताना उदय सामंत यांनी ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत उपरोधिक टोला लगावला. त्यांनी फारच लवकर पाठिंबा दिला. तब्बल सोळाव्या दिवशी पाठिंबा जाहीर केला. यावरूनच त्यांची तत्परता दिसते. राम मंदिर बांधू नये असे सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर जे लोक जाऊन बसलेत, त्यांनी आता आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. नागपुरात रामरक्षा पठण करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण तुम्ही काहीतरी केले म्हणून मी तुमच्या घरासमोर येणार, हा शालेय शिक्षणातील खेळासारखा प्रकार आहे. यांचे सगळेच निर्णय उशिरा असतात, अशी टीका सामंत यांनी केली.

‘लाडकी बहीण’ योजनेत पात्र महिला वगळली नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना सामंत यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधक केवळ वगळलेली नावे आणि संख्येची नकारात्मक चर्चा करत आहेत. मात्र या योजनेतून किती कोटी भगिनींना थेट फायदा मिळतोय, हे सांगण्याचे धाडस त्यांच्यात नाही. काही ठिकाणी अनावधानाने नोकरी करणाऱ्या महिलांचे तर काही ठिकाणी पुऊषांच्या नावाने अर्ज भरले गेले होते. असे आक्षेपार्ह अर्ज केवळ तांत्रिक तपासणीसाठी बाजूला ठेवले आहेत. सरकारने कोणत्याही पात्र महिलेला योजनेपासून वंचित ठेवलेले नाही. विरोधक केवळ राजकीय खेळी खेळत आहेत, असा खुलासा त्यांनी केला.

    वैयक्तिक आयुष्यात डोकावणे ही आमची संस्कृती नाही!

ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत आणि अयोध्या पोळ यांच्या संदर्भातील वादावर बोलताना सामंत यांनी विनायक राऊत यांच्या घरातील तो कौटुंबिक विषय असून सध्या न्यायालयात आहे. त्यांनी आणि संबंधित व्यक्तीने यावर खुलासा केला आहे. माझ्यावर चांगले संस्कार असल्याने मी अशा कौटुंबिक विषयांचे राजकीय भांडवल करू इच्छित नाही. जे काही योग्य असेल त्यावर पोलीस किंवा न्यायालय निर्णय देईल. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची प्रथा आणि संस्कृती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नसल्याचे सामंत म्हणाले. भाजप नेते नीतेश राणे यांच्या आमिर खान संदर्भातील वक्तव्यावर, ते योग्य की अयोग्य हे भाजपचे नेते सांगू शकतील. मात्र कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात शिरून राजकीय फायदा घेण्याची माझी वृत्ती नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत