अमेरिकेने इराणविरोधातील आपल्या लष्करी मोहीमेची व्यक्ती आणि आक्रमकता वाढवली असून यावेळी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदराला लक्ष्य केले आहे. या इराणी बंदराशी भारताचे हितसंबंधही जोडलेले असून यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर भारत सरकार साहजिकच चिंतीत असेल. चाबहार बंदराच्या माध्यमातून भारत थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये पोहोचतो, पण अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे भारताच्या योजनांना खीळ बसू शकते. मात्र, चाबहार बंदरावरील हल्ल्यामुळे नुकसानीचे प्रमाण प्रत्यक्ष पाहणीनंतरच कळू शकेल.
भारतासाठी गेमचेंजर ‘चाबहार’ बंदर
ओमानच्या आखातातील मुखाशी वसलेले चाबहार बंदर इराणचे पहिले खोल पाण्यातील बंदर असून भारत 2002 पासून या प्रकल्पाशी जोडलेला आहे आणि 2016 मध्ये भारत, इराण व अफगाणिस्तान यांच्यातील त्रिपक्षीय करारानंतर या बंदराच्या विकासाला गती मिळाली. भारताने आतापर्यंत या प्रकल्पात 120 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली असून 2017 मध्ये याच बंदरातून अफगाणिस्तानला गव्हाची पहिली खेप पाठवलेली.
दुसरीकडे चाबहार बंदराचे केवळ व्यापारिक महत्त्व नाही तर, पाकिस्तानचे ग्वादर बंदर, जे चीनने विकसित केले आहे, मध्य-पूर्वेतील ड्रॅगनच्या सामरिक उपस्थितीचे प्रमुख केंद्र मानले जाते. अशाप्रकारे, या बंदरामुळे भारताला पश्चिम आशियात संतुलन साधण्याची आणि चीन-पाकिस्तानच्या वाढत्या सागरी धोरणाला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळते. त्यामुळे, या बंदरावरील कोणत्याही संकटाचा भारताच्या सामरिक स्थानावर परिणाम होऊ शकतो.
पाकिस्तानला डावलण्याचा सर्वात महत्तवाचा सागरीमार्ग
या इराणी बंदरामुळे भारताला पाकिस्तानी सीमा ओलांडल्याशिवाय अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि रशियापर्यंत व्यापार करणे शक्य झाले आहे. तसेच चाबहार बंदर भारताच्या कनेक्टिव्हिटी धोरणाचा महत्त्वाचा घटक असून आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर – INSTC ला देखील जोडलेले आहे, जो इराणमार्गे भारताला मध्य आशिया, रशिया आणि युरोपशी जोडतो.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर चाबहार बंदराची स्थिती काय?
इराणच्या या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदरावर अमेरिकेच्या अलीकडच्या हल्ल्यानंतर भारत सरकारची नक्कीच चिंता वाढली असेल, पण बंदराचे नेमके किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यावरच नुकसानीचे खरे मूल्यांकन करणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.
सामरिक आणि आर्थिक आघाडीवर भारतासाठी चाबहार बंदर भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. या सागरीमार्गातून भारत व्यापार, मानवतावादी मदत आणि प्रादेशिक संपर्क वाढवत आहे, तुपामुळे बंदराचे कोणतेही मोठे नुकसान झाल्यास भारताच्या प्रादेशिक संपर्क आणि व्यापारी हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.
भारताच्या दीर्घकालीन धोरणाला फटका
या बंदरानजीक सतत वाढणाऱ्या लष्करी तणावामुळे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक योजनांना आव्हान निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढला आणि त्याचा परिणाम पश्चिम आशियातील गुंतवणूक, व्यापार आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांवर होईल. अशा परिस्थितीत, भारताचे मध्य आशियाई प्रवेश मार्ग, INSTC प्रकल्प आणि चीनच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्याच्या धोरणाला धक्का बसू शकतो. त्यामुळे सरकारचे चाबहारशी संबंधित सर्व घडामोडीवार बारीक लक्ष असेल.

