Headlines

L.K. Advani: वानप्रस्थातील भीष्माचार्य| Maharashtra Times


– मंगेश वैशंपायन
राजकीय नेते पत्रकारांना न टाळता त्यांच्याशी बोलत आणि बोलले तर शिवीगाळीपासून कटाक्षाने दूर राहत अशा काळात, म्हणजे सन २०११ मध्ये भाजपचे भीष्माचार्य असे सार्थ वर्णन केले जाणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा सुरू होती. प्रत्येक दिवशी संध्याकाळी अडवाणी पत्रकारांना त्यांच्या ‘रथा’मध्ये बोलावून घेत. मग प्लेटस् भरून फरसाण येत असे. आमच्या प्लेटस् भराभर रिकाम्या होत, पण ८४ वर्षीय अडवाणीच्या प्लेटमध्ये फरसाण थोडंच संपलेलं असे व ती प्लेट तशीच परत जात असे. का, तर अडवाणी चमच्याने फरसाण न खाता ते हातावर घेत व तेवढेच खात असत! त्यांच्या वाढदिवशी पृथ्वीराज रस्त्यावरील निवासस्थानी अडवाणीच्या टेबलवर बसलेल्यांना तर आपण किती खा खा खातोय, असा कॉम्प्लेक्स यावा इतका मित आहार ते घेत. ‘मितभाषा, मितनिद्रा, मितआहारे, करी दृढ अभ्यास,’ ही अध्यात्मात मोक्षाची पायरी मानली जाते. पंचेंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी नाना उद्योग करण्यापेक्षा एखादा दिग्गज नेता फक्त आपल्या वाणीवर, खाणं आणि बोलणं यावर जबरदस्त नियंत्रण कसं ठेवतो याचा वस्तुपाठच त्यानिमित्तानं मिळाला. बोलत असताना, अगदी तुमच्याशी खासगीत सुद्धा बोलत असताना एक शब्द इकडचा तिकडे होणार नाही, याबाबत ते कटाक्षानं जागरूकता बाळगत.

भ्रष्टाचार आणि काळा पैसा याविरोधात जनमत तयार करण्यासाठीची ती ‘जनचेतना यात्रा’ (२०११) अडवाणींच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीतील अखेरची यात्रा ठरली. १९९० मधल्या राम रथ यात्रेचं वर्णन अडवाणींच्याच शब्दांत करायचं तर, ‘त्या यात्रेमुळे भाजपला राजकारणातील कॅरेक्टर ॲक्टर वरून मेन ॲक्टर बनवलं.’ नंतर अडवाणींनी पाच यात्रा काढल्या. डॉ. मुरली मनोहर जोशी अडवाणींच्या त्या रथाचं फर्मास वर्णन करत! राम रथ यात्रेमुळंच त्याआधी राजकारणात पूरक मानला जाणारा भाजप पुढे स्वतःच्या बळावर सत्ता मिळवण्याची क्षमता असलेला पक्ष म्हणून उदयास आला. १९९०मध्ये बिहारमध्ये ती रथयात्रा रोखण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली. पुढे मोदी सरकारमध्ये मंत्री झालेले तत्कालीन जिल्हाधिकारी आर. के. सिंह त्यांना अटक करण्यास पोहोचले तेव्हा त्यांनी संघर्ष न करता तुम्ही (प्रशासन) आपलं कर्तव्य बजावत आहात, असे सांगणाऱ्या अडवाणींच्या व्यक्तिमत्त्वातील धीरगंभीरता, शिस्त आणि सन्मानशीलता दिसून आली.

भारतीय राजकारणातील नेतृत्वाच्या पिढ्यांचा विचार केला तर स्वातंत्र्यलढ्यातून घडलेली पहिली पिढी आणि त्यानंतरची दुसरी-तिसरी पिढी घडवण्यात अडवाणी महत्त्वाचे दुवा ठरतात. नरेंद्र मोदी, प्रमोद महाजन, अरुण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, येडियुरप्पा, सी. पी. राधाकृष्णन अशा अनेकानेक नेत्यांच्या राजकीय उभारणीत अडवाणींच्या नेतृत्वाचा जबरदस्त प्रभाव होता. सार्वजनिक जीवनातील शुचितेचा आग्रह धरणारे अडवाणी सहज उत्तेजित होत नसत आणि कोणाविषयी सहसा दीर्घद्वेष बाळगत नसत. त्यांच्या वैयक्तिक जीवनातही विलक्षण शिस्त होती.

अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची जोडी भारतीय राजकारणातील दुर्मीळ उदाहरण मानले जाते. या दोन्ही नेत्यांनी दीर्घकाळ परस्परपूरक भूमिका निभावल्या. दोघांचे स्वभाव, कार्यपद्धती आणि सार्वजनिक प्रतिमा वेगवेगळ्या; पण विचारांच्या, पक्षाच्या वाढीच्या ध्येयासाठी त्यांनी कधीही स्पर्धेचा मार्ग स्वीकारला नाही. अडवाणींच्या रथयात्रांवर अटलजींनी, ‘रावण रथी विरथ रघुवीरा’, असा तिरकस शेरा मारला तरी अडवाणींनी कधी जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. अडवाणींनी ‘स्युडो-सेक्युलरिझम'(छद्म धर्मनिरपेक्षता) ही संकल्पना प्रभावीपणे मांडून हिंदुत्ववादी विचारसरणीला केवळ धार्मिक भावनेपुरतं मर्यादित न ठेवता तिचं राजकीय आणि वैचारिक अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सेक्युलरिझम आणि स्युडो-सेक्युलरिझम यांमधील वाद त्यांनी राष्ट्रीय चर्चेचा विषय बनवला. त्यामुळे डावे, समाजवादी आणि काँग्रेसवादी विचारप्रवाहांच्या विरोधात एक पर्यायी वैचारिक चौकट उभी राहिली, पण वाजपेयी-अडवाणींनी काँग्रेस व इतरांची ही संकल्पना गृहीत धरून एकाप्रकारे त्यानुसार भाजपचं इंटरप्रिटेशन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सेक्युलॅरिझम हा आपला संदर्भबिंदू आहे, असं मानून त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी-अमित शहांच्या राजकारणानं हा संदर्भबिंदूच बदलून टाकला. हा पिढ्यांचा बदल किंवा पिढ्यांतील अंतर आहे. सलग दोन लोकसभा निवडणुका ज्यांच्या चेहऱ्यावर लढवल्या गेल्या त्या अडवाणींनी हे पिढ्यांतील अंतर स्वीकारण्यास २०१३-१४ मध्ये जी खळखळ केली त्यामुळे ते आणखी बाजूला पडले. त्यांचा मूळ स्वभाव अधिक सर्वसमावेशक असल्यानं २०१४ नंतरच्या भाजपच्या आक्रमक राजकीय प्रवाहांशी त्यांचं मोठं वैचारिक अंतर निर्माण झाल्याचं निरीक्षक मानतात.

अडवाणी यांच्या राजकीय जीवनाचा पाया आणीबाणीविरोधी संघर्षात घातला गेला. १९७५मध्ये घोषित झालेली भारतातील आणीबाणी ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत वादग्रस्त घटना मानली जाते. या काळात अडवाणीही लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ठामपणे उभे राहिले. हा संघर्ष केवळ एखाद्या व्यक्तीविरुद्ध नव्हता, तर सर्वसत्ताधारी प्रवृत्तीविरुद्धचा होता.आणीबाणीनंतर देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री झाल्यानंतर अडवाणी यांनी माध्यमांच्या भूमिकेवर भाष्य करताना एक वाक्य उचारलं होतं – “पत्रकारांना वाकायला सांगितलं तर ते रांगू लागले.” या एका वाक्यातून त्यांनी त्या काळातील वातावरणावर अत्यंत मार्मिक भाष्य केलं होतं. दर वर्षी ज्या दिवशी अडवाणींमध्ये वेगळाच उत्साह संचारत असे तो दिवस म्हणजे २५ जून. यंदा या दिवशी आणीबाणीला ५१ वर्षे झाली. आणीबाणीत तरुंगवास भोगलेल्यांपैकी आज हयात असलेल्या मोजक्या नेत्यांत तेव्हाही ज्येष्ठ असलेल्या व आता आयुष्याच्या शतकी खेळीच्या समीप असलेल्या या भीष्माचार्यांच्या कामागिरीच्या आठवणी जागवण्यासाठी हा प्रपंच.

mangesh.w@timesofindia.com

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत