Headlines

China News: हवाई दलापासून लष्करापर्यंत, बडे अधिकारी बडतर्फ; चीनच्या पोलादी पडद्यामागे चाललंय काय?


China News: चीनमध्ये अचानक बड्या अधिकाऱ्यांची पदांवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. लष्करापासून ते अगदी हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

china xi jinping military
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बीजिंग: चीनशी संबंधित एक मोटी बातमी समोर आली आहे. सरकारनं एकाच वेळी अनेक बड्या सैन्य अधिकाऱ्यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. त्याची माहिती सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआनं दिली. बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माजी वित्तीय नियामक प्रमुख ली युंझे आणि पॉलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई यांच्या नावांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ते चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. बड्या अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीमागील कारणांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. त्यांना हटवण्याचं कारण चीनकडून जाहीर करण्यात आलेलं नाही.

चीनची सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात वरिष्ठ संस्था नॅशनल पीपल्स काँग्रेसनं सहा सैन्य खासदारांसह दोन बड्या नेत्यांची पदं संपुष्टात आणली आहेत. नॅशनल पीपल्स काँग्रेस चीनमधील सर्वात मोठी कायदे करणारी संस्था आहे. त्यामुळे या संस्थेत होणारे बदल महत्त्वाचे मानले जातात. हटवण्यात आलेल्या नेत्यांमध्ये माजी वित्तीय नियामक प्रमुख ली युंझे आणि नुकतीच चौकशी झालेले पॉलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई यांच्या नावांचा समावेश आहे.
Maharashtra TimesChina Plane Crash: चीनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखी घटना; बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीवर विमान आदळलं; परिसरात खळबळ
नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीकडून जारी करण्यात आलेल्या नोटिसच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली. या नोटिशीत पदावरुन हटवण्यामागचं कोणतंही कारण नमूद केलेलं नाही. चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाया भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा भाग आहे. हे अभियान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या अभियानाच्या अंतर्गत अनेक बड्या अधिकाऱ्यांची आणि टॉप जनरल्सची चौकशी करण्यात आली. त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. नुकतीच करण्यात आलेली कारवाई याच अभियानाचा भाग मानली जात आहे.
Maharashtra TimesGaza Israel Conflict: गाझात 20 हजार मुलांना संपवलं; सैनिकांनी ‘गेम’ खेळून पोरांना अपंग केलं; इस्रायलचा क्रूर चेहरा
ज्या सैन्य खासदारांची हकालपट्टी करण्यात आली, त्यात जनरल शू श्युछियांग यांचं नाव सर्वात वर आहे. ते सेंट्रल मिलिटी कमिशनच्या इक्विपमेंट डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे प्रमुख होते. हा विभाग चीनच्या सैन्य म्हणजेच पीएलएसाठी शस्त्र आणि उपकरणं तयार करण्याचं, खरेदीचं आणि त्यांच्या चाचण्या घेण्याचं काम करतो. यासोबतच श्यू श्युछियांग वर्ष २०२२ पासून चीनच्या मानवी अंतराळ मोहिमेचे कमांडर-इन-चीफदेखील होते. त्यांचं पद अतिशय मोठं आणि महत्त्वाचं होतं.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा