महाराष्ट्राचे लाडके दैवत आणि वारकरी संप्रदायाचे आराध्य असणाऱ्या विठ्ठलाच्या जयघोषासाठी पंढरी सज्ज झाली आहे. यानिमित्ताने प्रशासनाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यानुषंगाने ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी मार्गात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यात ११ ते १८ जुलै या कालावधीत वाहतुकीत महत्त्वाचे मोठे बदल केले आहेत. पालखी मार्गावर वारकऱ्यांसह भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
असा असणार नवा पालखी मार्ग
मिळालेल्या माहितीनुसार पालखी मार्गात झालेला नवा बदल पुढीलप्रमाणे असेल. ११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १३ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सासवडकडे दिवेघाट आणि बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने खडी मशीन चौक, कात्रज आणि कापूरहोळमार्गे वळविण्यात येतील. तर सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड-शिवापूर मार्गाने सोडण्यात येणार आहे.
सासवड – जेजुरी- वाल्हे – निरा
१३ जुलै पहाटे २ वाजल्यापासून १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत सासवड-जेजुरी-वाल्हे-निरा या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे ते निरा आणि निरा ते पुणे या दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी, पारगाव मेमाणे, सुपे, मोरगाव आणि निरा या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
बदललेल्या मार्गानुसार १५ जुलै रोजी पहाटे २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाल्हे ते लोणंद या टप्प्यातही वाहतुकीत बदल राहणार आहेत. याकाळात पुण्याहून निराकडे तसेच निराहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सासवड-जेजुरी-मोरगाव हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
शिरवळ मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मार्ग १५ ते १८ जुलै या कालावधीत लोणंद-फलटण मार्गावरील वाहतूकही शिरवळमार्गे असणार आहे, तसेच पुणे ते फलटण आणि लोणंद तसेच तेथून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी शिरवळमार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
