![]()
नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात भूखंडांची बेकायदेशीर पोटविभागणी करून म्हाडाच्या घरांची राखीव जागांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. विधान परिषदेत बोलताना अनिल परब यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. नाशिक महापालिका हद्दीत नियमांच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी विकास आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडण्यात आल्याचे अनिल परब यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. परबांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी 49 जणांवर गुन्हे दाखल झाले असून 18 ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल समोर येणार असल्याची ग्वाही दिली आहे. सभागृहात अनिल परब काय म्हणाले? विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना अनिल परब म्हणाले, नाशिकसह महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात 1981 च्या परिपत्रकाचे उल्लंघन करून जमिनीची पोटविभागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. ना हरकत प्रमाणपत्र न घेताच 4000 चौ. मी. पेक्षा लहान प्लॉट पाडले गेले. 7/12 वेगळे करून ले-आऊट मंजूर करताना म्हाडाचे 20 टक्के राखीव, 10 टक्के ओपन स्पेस आणि 5 टक्के सुविधा क्षेत्रही नाहीसे करण्यात आले. 2013 पासून 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये विकासक, अधिकारी आणि नगररचना विभागाच्या संगनमताने हा घोटाळा सुरू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. शासनाने एमआरटीपी कायद्यानुसार सखोल चौकशी करून बेकायदेशीर ले-आऊट रद्द करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी परब यांनी केली आहे. बिल्डरांनी ढापलेली जमीन परत कशी घेणार आहात? पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, नाशिक महापालिकेत नियमातून वाचण्यासाठी 4 हजार चौ.मी. होऊ नये म्हणून त्या जमिनीचे तुकडे पाडण्यात आले. अशी 200 प्रकरणे नाशिकमध्ये झाली आहे. 49 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंकेश शहा या बिल्डरने 164 फ्लॅट म्हाडाला दिले नाहीत. याचा हिशोब किती होतो हे आता तुम्हीच ठरवा. 49 लोक सोडले तर बाकी लोकांवर तुम्ही काय कारवाई केली? या बिल्डरांनी ढापलेली जमीन परत कशी घेणार आहात? हे केवळ नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. दोषींवर आपण काय कारवाई करणार आहात? अशी विचारणा देखील परब यांनी केली आहे. अनिल परबांच्या आरोपांना उदय सामंतांचे उत्तर अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, या प्रकरणात आतापर्यंत 49 लोकांवर कारवाई झाली आहे आणि त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. यामध्ये उपअधीक्षक, नायब तहसीलदार यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल 18 ऑगस्टपर्यंत समोर येईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली आहे.
Source link
बिल्डरांनी ढापलेली जमीन परत कशी घेणार आहात?:अनिल परबांचा सभागृहात सवाल, नाशिकच्या म्हाडा प्रकरणावरून संताप
