Headlines

मास्तरांना कडक सॅल्यूट! महापुरासारखा काळ समोर असताना १६४३ विद्यार्थ्यांना वाचवलं, पण शेवटी आक्रित घडलं| Maharashtra Times


Nepal Flash Flood: नेपाळमध्ये बुधवारी महापूर आला. पायाभूत सुविधेपासून शाळा, घरे उद्ध्वस्त झाली. अनेकांचा जीव गेला असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अशात मुख्याध्यापकांच्या प्रसंगावधानामुळे १६४३ विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा जीव वाचला आहे. मात्र एक शिक्षक आणि शिपाई हे महापुरच्या पाण्यात वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. शाळेची ३ मजली इमारत पुरात वाहून गेली. स्थानिकांनी मुलांचे जीव वाचवल्याने त्यांना ‘हिरो’ म्हंटल.

nepal flash flood
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरात सगळंच उद्ध्वस्त झालं. मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अजूनही २ हजारहून अधिक लोक बेपत्ता आहेत. या महापुरात शाळा , कॉलेज देखील उद्धवस्त झाली आहेत. अशात मुख्याध्यापकाच्या प्रसंगावधानामुळे १६४३ विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे. शाळेतील सर्व मुले आणि शिक्षक जवळच्या एका टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली पोहोचले. त्यांच्या डोळ्यादेखत काही क्षणात महापुराच्या पाण्यात तीन मजली शाळा वाहून गेली.

या महापुराने शाळेतील एक शिक्षक आणि शिपाई यांनाही वाहून नेले. त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. सुदैवाने या संकटात शाळेत शिक्षणासाठी आलेल्या १६४३ विद्यार्थ्यांचा जीव बचावला आहे. शाळेच्या मुख्यध्यापकांना संकट येत असल्याची चाहूल आली आणि त्यांनी तातडीने शाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी नेलं. त्यांना आलेल्या एका फोनमुळे हजारोहून अधिक मुलांचे प्राण वाचले.

काय घडलं नेमकं?

त्रिभुवन त्रिशूली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र दवडी यांना बुधवारी ९:२० ला त्यांच्या एका मित्राचा कॉल आला. नदीच्या महापुरात आमचे गाव वाहून गेलं आहे. तुम्ही तिथून पळा, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्या शाळेत १६४३ मुले ३ मजली इमारतीमध्ये होती.

सुरुवातीला त्यांना शाळा सुरक्षित वाटली. कारण शाळा नदीपासून ६० मीटर उंचीवर आहे. मात्र एका पालकाने धावत येऊन सांगितले की, पाणी अत्यंत वेगाने वाढत आहे. दवंडी यांनी काहीच विचार न करता तातडीने शाळेची घंटा वाजवली. शिक्षकांना वर्ग रिकामे करण्यास सांगितले. त्यांनी शाळेच्या बस चालकांना कॉल केला, त्यांना परत जाण्यास सांगितले.

Maharashtra TimesNepal Flood: काळ आला होता पण वेळ नाही! नेपाळच्या महाप्रलयात चहाच्या ब्रेकमुळे 5 जणांचे वाचले जीव, रात्रीचा थरार

एका बस चालकाशी संपर्क होऊ शकला नाही. ती बस त्या पुलावरून जातांना त्यांना दिसली. एक मुलगी घाबरल्यामुळे तिला पॅनिक अटॅक आला. तिला बाईकवरून डोंगरावर नेण्यात आले. बाकी सर्व मुले पायी वर पळाली. सर्व मुलांनी पिंपळाच्या एका झाडाखाली आश्रय घेतला. त्यांच्या डोळ्यादेखत शाळेची इमारत वाहून गेली. एक शिपाई आणि शिक्षकांशिवाय मुख्याध्यापकांनी शाळेलतील १६४३ मुले आणि शिक्षकांचे जीव वाचवले. मुख्याध्यापकांच्या प्रसंगावधानामुळे मुलांचे प्राण वाचले.

मुलांना वाचवलं मात्र स्वतःचा जीव गेला

संतोष पेरियार (वय ३२) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते सामाजिक इतिहासाचे शिक्षक होते. संतोष पेरियार हे नदीकाठी असलेल्या त्यांच्या भाड्याच्या खोलीत नाश्ता बनवण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते महापुरातवाहून गेले. तर शाळेचे शिपाई सुलतान लामा यांचा देखील मृत्यू झाला. सुलतान लमा हे शाळेचे दरवाजे बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते देखील महापुरात वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.

स्थानिकांनी म्हटलं ‘हिरो’ पण त्यांना तसे वाटत नाही

मुलांना वाचवल्याबद्दल स्थानिकांनी त्यांना हिरो म्हटलं, मात्र त्यांनी ‘मी दुसरं काय करू शकलो असतो’ असे म्हटलं. “मी आता बत्तर येथे पोहोचलो आहे. जेव्हा आम्ही शाळेतून बाहेर पडलो, तेव्हा आम्ही टेकडीच्या दिशेने धावत गेलो. तिथे जे काही उपलब्ध होईल त्याआधारे आम्ही दिवस काढले. आम्ही तिथे जवळपास अडकूनच पडलो होतो. माझ्यासोबत जवळपास ४० ते ५० कर्मचारी होते”, असे दावडी यांनी सांगितले.

याआधीही पुराचा तडका बसला

महापूर आलेल्या रसुवा जिल्ह्याला याआधीही पुराचा तडाखा बसला आहे. एप्रिल २०१५ मध्ये ७.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे हिमस्खलन झाले होते. या हिमस्खलनाखाली ‘लांगटांग’ मधील सर्व ३०० ​​रहिवासी गाडले गेले होते. तर दक्षिण आशियात ८,९६२ लोकांचा बळी घेतला होता.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

नेपाळमध्ये आलेल्या महापुरात ७०० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २५०० पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये विदेशी नागरिकांचा समावेश आहे. पुरातअडकलेले काही भारतीय नागरिक नेपाळमधून सुरक्षित परतत आहेत. तर काही अजूनही बेपत्ता आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा