चरण शुद्धता मनुष्यधर्माची ओळख. परमार्थात आचरणास अनन्य महत्त्व आहे. आचरण शुद्धता लौकिक जीवनात व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचे नियंत्रक म्हणून कार्य करते. समाजस्वास्थ्य उत्तम राहावे म्हणून व्यक्तीचे आचरण,चारित्र्य आणि स्वभावधर्माच्या शुद्धतेवर सर्व संतानी भर दिला. दंभ, अभिमान,अहंकार, तृष्णा, वासना, निंदा, काम, क्रोध, मोह, मत्सर या दुर्गुणांना त्यागून सत्यान्वेशी, पवित्र, निर्मळ, निर्मोही, निरपेक्ष, निर्विकार मनाची जडणघडण व्हावी. मनुष्यधर्माचे वर्म ओळखून व्यक्तीने सामाजिक व्यवहार करावा व घसरणीच्या प्रसंगातही आचरण शुद्ध राखावे ही संताची अपेक्षा.
धीर धरी सत्य हे तो नारायण।
शुद्ध आचरण न सांडावे।।
लौकिकाची काही न धरावी लाज।
हेंचि निज काज साधावे तें॥
संत नामदेवांचे प्रमाण आहे. संकटे, दुःख किंवा अडचणी उद्भवल्यास मनुष्याने विचलित न होता सत्याचा मार्ग सोडू नये. परिस्थिती विपरीत आली तरी चांगले वर्तन सोडू नये. समाज काय म्हणेल? लोकं काय विचार करतील? किंवा आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल का? याची अनावश्यक चिंता न करता सत्य आचरणासाठी लोकमताची भीती बाळगू नये. सत्य हे सापेक्ष असले तरी सत्याचे एक मूळ शुद्ध रूप असते; ते लक्षात घेवून आचरण ठेवले तर आचरण शुद्ध ठरते. मनुष्यधर्माचे खरे कर्तव्य आणि जीवनाचे खरे साध्य हेच आहे की त्याने सत्य, धैर्य आणि शुद्ध आचरणाचा मार्ग स्वीकारावा.
अगदी जे आपली निंदा करतात, त्यांची टीका देखील मन लावून ऐकावी; कारण इतरांच्या टीकेतून आपले दोष समजू शकतात. तसेच कोणी आपली स्तुती केली म्हणून त्याने गर्विष्ठ होऊ नये, आपल्या स्तुतीला अकारण महत्त्व देवू नये. मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीचा मोह टाळून मनात एक विनयशील भाववृत्तीची कायमची रुजवण करून दंभ, वृथा अभिमान सोडून नम्र व्हावे. निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टींनी विचलित होवून शुद्ध आचरण न सांडावे हीच आमुच्या सर्व संताची अपेक्षा होती ती सार्थ ठरावी इतकेच.

