Headlines

Nepal Floods: अखेरचा कॉल, मग फोन बंद; अर्धवट मेसेजनं धडधड वाढली; नेपाळमध्ये आप्त अडकलेल्यांची आपबिती


नेपाळमध्ये आलेल्या पुरात २७० जणांनी जीव गमावला असून बेपत्ता असलेल्या नागरिकांचा आकडा बराच मोठा आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. नेपाळमध्ये १०५ भारतीय पर्यटक अडकले आहेत. त्यांच्या कुटुंबियांची घालमेल वाढली आहे.

nepal flood rescue
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू: नेपाळच्या भोटेकाशी नदीला आलेल्या भीषण पुरानं होत्याचं नव्हतं झालं. आतापर्यंत २७० जणांचे शव सापडले आहेत. बेपत्ता झालेल्या नागरिकांचा आकडा मोठा असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. कैलाश-मानसरोवर यात्रेला गेलेल्या अनेक भारतीयांचा त्यांच्या कुटुंबांशी, नातेवाईकांशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून प्रार्थना सुरू आहेत.

भीषण पुरानंतर ३८४ पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यातील २९१ पर्यटक परदेशी असून ९३ जण नेपाळी आहेत. बेपत्ता झालेल्या भारतीय पर्यटकांचा आकडा १०५ च्या घरात आहे. पश्चिम बंगालपासून तामिळनाडूपर्यंत अनेक जण आपल्या कुटुंबांच्या माहितीसाठी सरकार आणि दूतावासाच्या सातत्यानं संपर्कात आहेत.

पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधील गांगुली कुटुंबाची घालमेल वाढली आहे. बामनारा येथील तपोवन सिटी भागात वास्तव्यास असलेल्या मौसमी गांगुली आणि अरिंदम गांगुली २१ ऑगस्टला कैलाश-मानसरोवर यात्रेसाठी ‘चलो जाए’ संस्थेसोबत रवाना झाले. त्यांच्या ग्रुपमध्ये दुर्गापूरचे ५-६ जण आणि एकूण ३६ प्रवासी आहेत. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना प्रवासाची उत्सुकता होती. कठीण प्रवास सोपा व्हावा यासाठी अरिंदम गेल्या काही दिवसांपासून नियमित चालायला जायचे.

प्रवासाला गेल्यावर त्यांचा दोन्ही लेकींशी मंगळवारी रात्री संवाद साधला. त्यानंतर त्यांचा फोन सतत वाजत आहे. पण समोरुन कोणताही प्रतिसाद मिळत नाही. डोंगराळ भागात नेटवर्कची समस्या असावी, असा सुरुवातीला त्यांचा समज झाला. पण नेपाळमधील पुराच्या बातम्या येऊ लागताच आता त्यांच्या कुटुंबाची धडधड वाढू लागली आहे.

तामिळनाडूच्या मुथुनाथन यांची कहाणीदेखील अशीच काहीशी आहे. त्यांची पत्नी शिवरंजनी २३ ऑगस्टच्या संध्याकाळी कैलाश यात्रेला रवाना झाल्या. प्रवासादरम्यान त्यांची बस तिबेटच्या सीमेवर पोहोचली. मुथुनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर प्रचंड भूस्खलन झालं. बसमधील प्रवासी तिथून निघून कसेबसे एका सैनिकी तळापर्यंत पोहोचले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शिवरंजनी यांनी पतीला व्हिडीओ कॉल केला. घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल, असं कुटुंबाला वाटत होतं. पण काही वेळातच पुराची बातमी आली. संध्याकाळी साडे चारला मुथुनाथन यांना पत्नीचा ऑडिओ मेसेज आला. पर्यटक नेपाळ सरकारच्या संपर्कात असून हवाई मार्गानं सुटकेचे प्रयत्न केले जात असल्याचं शिवरंजनी यांनी सांगितलं. याच त्यांचा शेवटचा मेसेज होता. तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा