नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर सरकारकडून हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, दुसरीकडे निधीअभावी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत, यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे
.
धुळे जिल्ह्यातील एका शाळेत ‘स्मार्ट क्लास’च्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती वराळे बोलत होते. याच शाळेत त्यांनी शालेय शिक्षण घेतले होते. यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेची सद्य:स्थिती, मराठी भाषेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांवर सविस्तर भाष्य केले.
नेमके काय म्हणाले न्यायमूर्ती वराळे?
न्यायमूर्ती वराळे म्हणाले, “सरकार विविध विकासकामांसाठी आणि उपक्रमांसाठी भरघोस निधी दिल्याचे दावे करते. उपमुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यासाठी 32,000 कोटी रुपये तर मुख्यमंत्र्यांनी 34,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच एका कॉरिडॉर प्रकल्पासाठी 11,000 कोटी रुपये मंजूर झाल्याचे मी वाचले. सरकार हजारो कोटी रुपये खर्च करत आहे, याला माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, या हजारो कोटींपैकी केवळ 0.1 टक्के म्हणजे सुमारे 32 कोटी रुपये जरी सरकारने शिक्षणासाठी दिले असते, तरी राज्यभरात बंद पडलेल्या 100 ते 125 मराठी माध्यमाच्या शाळा नक्कीच वाचवता आल्या असत्या.”

शैक्षणिक बजेटमधील कपातीवर नाराजी
वाढत्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षणावरील तरतूद वाढवण्याऐवजी ती कमी केली जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. “केंद्राच्या पातळीवर शिक्षणासाठीचे बजेट पूर्वी 8 ते 12 टक्क्यांच्या आसपास असायचे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता यात वाढ होणे अपेक्षित होते, मात्र गेल्या अनेक वर्षांत हा आकडा 13 टक्क्यांपर्यंतही पोहोचू शकलेला नाही,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आश्रमशाळेतील मुलींच्या मृत्यूवर हळहळ
ग्रामीण भागातील शाळा आणि आश्रमशाळांमधील अपुऱ्या मूलभूत सुविधांवर बोलताना न्यायमूर्ती वराळे यांनी एका अत्यंत दुर्दैवी घटनेचा संदर्भ दिला. “एका निवासी आश्रमशाळेत योग्य सुविधा नसल्यामुळे विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागले. तिथे साप चावल्याने तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि एका मुलीवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत,” असे सांगत त्यांनी प्रशासनाने मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
मराठी माध्यमातील शिक्षणाचा अभिमान
यावेळी न्यायमूर्ती वराळे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. 10वी पर्यंतचे शिक्षण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. “प्रादेशिक भाषेतून शिक्षण घेतल्याने माझ्या करिअरमध्ये कधीही अडथळा आला नाही, उलट माझा दृष्टिकोन अधिक समृद्ध झाला. मराठी भाषेने मला इतरांकडे पाहण्याचा एक मोकळा आणि व्यापक दृष्टिकोन दिला. माझ्या भाषेने मला बंधुभावाची शिकवण दिली,” असे सांगत त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि कवी सुरेश भट यांच्या विचारांचा दाखला दिला.
विद्यार्थ्यांना वाचनाचा मोलाचा सल्ला
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचा सल्ला दिला. “तुम्हाला जे आवडते ते नक्की करा आणि जे वाचायला हवेसे वाटते ते भरपूर वाचा. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन, ज्यांनी जगाचा इतिहास घडवला आणि बदलला अशा महान व्यक्तींबद्दल आवर्जून वाचा,” असा प्रेरणादायी संदेश न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी दिला.
हेही वाचा…
मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला: ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (24 ऑगस्ट) पुण्यात निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी भाषा, साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रा. यास्मिन शेख यांनी आयुष्याची अनेक दशके मराठी भाषेच्या अभ्यासाला आणि अध्यापनाला वाहिली. क्लिष्ट व्याकरणाचे नियम अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विशेष प्रसिद्ध होती. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संपादक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या मार्गदर्शक ठरल्या. येथे वाचा संपूर्ण बातमी
