Australia Vs Bangladesh : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये बांग्लादेशचा संघ ६४ धावांवर ऑलआऊट झाला. मिचेल स्टार्क याने जबरदस्त गोलंदाजी करत ६ विकेट काढल्या. या सामन्यामध्ये हेजलवुड आणि तस्कीन अहमद यांच्यामध्ये झालेला एक प्रकार सध्या चर्चेत आला आहे.

काय घडलं नेमकं?
मॅके येथे सुरू असलेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. अवघ्या ३८ धावांत त्यांचे ८ गडी तंबूत परतले होते. त्यावेळी तस्किन अहमद मैदानात होता. डावाच्या २८ व्या षटकात तस्किनने हवेत एक उंच फटका मारला. चेंडू खेळपट्टीच्या जवळच हवेत होता आणि गोलंदाज जोश हेझलवूड ( Josh Hazlewood ) हा सोपा झेल घेण्यासाठी चेंडूच्या दिशेने धावला. मात्र, त्याच वेळी धाव घेण्यासाठी धावणारा तस्किन अहमद थेट हेझलवूडला येऊन धडकला. या जोरदार धडकेमुळे हेझलवूडच्या हातातून झेल निसटला. या प्रकारानंतर हेझलवूड चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.
पंचांनी काय निर्णय दिला?
या प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन छावणीत संतापाची लाट उसळली. हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी तस्किनने ही धडक जाणूनबुजून दिल्याचे म्हणत पंचांकडे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड ( Obstructing the field ) अंतर्गत बाद देण्याची जोरदार मागणी केली. मात्र, पंचांनी हे अपील फेटाळून लावले. पंचांच्या मते, धाव घेताना तस्किन खाली पाहत होता आणि त्याचे चेंडूकडे लक्ष नव्हते, त्यामुळे त्याने जाणीवपूर्वक हा अडथळा आणलेला नाही.
पंचांनी तस्किनला जीवदान दिले तरी, त्याला या संधीचे सोने करता आले नाही. पुढच्याच षटकात पॅट कमिन्सने त्याला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले.
‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’चा नियम काय सांगतो?
मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (MCC) नियम ३७ (Rule 37) अंतर्गत बाद होण्याचा हा एक दुर्मिळ प्रकार आहे. या नियमानुसार, जेव्हा एखादा फलंदाज आपल्या शब्दांनी, कृतींनी किंवा धावण्याच्या पद्धतीमुळे जाणूनबुजून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला किंवा खेळाडूला अडथळा आणतो किंवा त्यांचे लक्ष विचलित करतो, तेव्हा पंचांकडून त्याला बाद (Out) दिले जाते.
स्टार्कचा कहर अन् बांगलादेशची दाणादाण
पहिल्या कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर हवेत उडणाऱ्या बांगलादेशला ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत जमिनीवर आणले. बांगलादेशचा संपूर्ण डाव अवघ्या ३४ षटकांत ६४ धावांवर संपुष्टात आला. स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्या २२ चेंडूंमध्येच ५ बळी घेत बांगलादेशची दाणादाण उडवली. त्याने एकूण ६ विकेट्स घेतल्या. तर, पॅट कमिन्सने ३ आणि हेझलवूडने १ विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियानेदिवसअखेर ८ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारत पहिल्याच दिवशी १०१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

