Headlines

सीओईपी परिसरात राजकीय व्यक्तींना प्रवेशबंदी:26 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय




सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परिसरात राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश करण्यास पुणे पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे. विद्यापीठातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. हा प्रतिबंध 26 ऑगस्टपर्यंत लागू राहील. शुक्रवारी, 21 ऑगस्ट रोजी सीओईपीच्या वसतिगृह परिसरात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला होता. या प्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने पुढील चार दिवस राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना परिसरात प्रवेश देऊ नये, अशी विनंती पोलिसांकडे केली होती. बाहेरील व्यक्ती किंवा राजकीय कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे शैक्षणिक वातावरणावर परिणाम होऊ शकतो आणि विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आदेशात नमूद आहे. त्यानुसार, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा संपूर्ण परिसर आणि वसतिगृहांमध्ये राजकीय व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरात आंदोलन, निदर्शने, धरणे, उपोषण, मोर्चा, रॅली, राजकीय सभा, बैठका, घोषणाबाजी तसेच फलक किंवा बॅनर लावण्यासही बंदी असेल. हा आदेश 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 26 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, वसतिगृहातील रहिवासी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती आणि प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने येणाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत कारवाई केली जाईल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी स्पष्ट केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत