Ireland Government Scheme: आयरिश महिलेशी लग्न केल्यास ७० लाख रुपये मिळतात, असा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलेली गोष्ट खरी आहे का? चला आपण जाणून या व्हायरल व्हिडीओचं सत्य

‘लग्न केल्यास मिळतील ७० लाख’
हा व्हिडीओ the_express360 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील भारतीय तरुण सांगतोय, “आयर्लंडमध्ये मी अनेक लोकांशी चौकशी केली. त्यांच्याकडून समजलं की तिथे ७० लाख रुपयांची एक स्कीम आहे.” त्यानंतर या तरुणासोबत असलेली तरुणी सांगतेय, “जर तुम्ही आयरिश महिलेशी लग्न केलं, तर तुम्हाला ७० लाख रुपये मिळू शकतात.” पण यासाठी एक अट आहे. लग्न केल्यानंतर तुम्हाला आयर्लंडमध्येच राहावं लागतं. आणि या पैशांचा वापर तुम्ही घर सजवण्यासाठी करू शकता, असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आलाय.
हा व्हिडीओ ७४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. नेटकऱ्यांनीदेखील आश्चर्यापोटी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणाला आधीच लग्न केल्याबद्दल पश्चात्ताप होतोय, तर कोणी आयर्लंडमध्ये जायचं कसं, याबद्दल विचारणा करत आहे. असो, पण खरंच या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे अशी काही योजना आयर्लंडमध्ये आहे का?
खरंच ७० लाख रुपये मिळतात?
आयरिश महिलेशी लग्न केल्यास ७० लाख रुपये मिळतील, अशी कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्रोत समोर आलेला नाही. त्यामुळे या व्हिडीओमध्ये तरुणाने केलेला दावा खोटा असू शकतो. आयर्लंडच्या Enterprise विभागाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, आयर्लंडमध्ये व्हेकंट प्रॉपर्टी रिफर्बिशमेंट ग्रँट नावाची योजना आहे. या योजनेअंतर्गत रिकाम्या किंवा जीर्ण घराची दुरुस्ती करून ते राहण्यायोग्य करण्यासाठी सरकारतर्फे ५० हजार युरोपर्यंत मदत मिळू शकते. काही परिस्थितींमध्ये ही रक्कम ७० हजार युरोंपर्यंत वाढू शकते. आयरिश नागरिकाशी लग्न केल्यास रहिवासाचे अधिकार किंवा परवानगी मिळण्याची प्रक्रिया लागू होऊ शकते. पण त्यासाठी सरकार ७० लाख रुपये देत नाही.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

