Headlines

'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले':राधाकृष्ण विखे पाटलांची टोला; जरांगेंचा गैरसमज दूर करण्याचे दिले आश्वासन




राज्यातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप करत सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यांच्या या विधानावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक शब्दांत पलटवार केला आहे. “रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही, त्यामुळे त्यांनी सध्या सुरू असलेले आपले उद्योग थांबवले तरी खूप झाले,” असा सणसणीत टोला विखे पाटील यांनी लगावला आहे. मराठा-कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांमधील त्रुटींच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौरे करत सरकारवर जोरदार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देताना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, जात पडताळणी समिती ही ‘अर्धन्यायिक प्राधिकरण’ (क्वासी-ज्युडिशियल अथॉरिटी) असल्यामुळे मुख्यमंत्री किंवा महसूलमंत्री तिला थेट निर्देश देऊ शकत नाहीत. असे असले तरी, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमिती अत्यंत सकारात्मकतेने काम करत असून याद्वारे अनेक चांगले निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या मनात असलेल्या शंका आणि गैरसमज संवादाच्या माध्यमातून नक्कीच दूर केले जातील, असा विश्वासही विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. धीरज परदेशी हल्ला प्रकरण अहिल्यानगर मनपाचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, या पोलिस तपासावर शंका उपस्थित करत आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधींनी पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे. याचबरोबर, आमदार जगताप यांनी उपस्थित केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल आणि आवश्यकतेनुसार या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसआयटी नियुक्तीची शिफारस करू, असेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर विखे पाटलांचे आश्वासन अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावांमधील शेतकऱ्यांनी ब्रिटिश काळापासून अकारी पडीत असलेली तब्बल साडेसात हजार एकर जमीन मूळ मालकांना परत मिळावी, या मागणीसाठी आक्रमक होत अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. उच्च न्यायालय आणि राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. यावर स्पष्टीकरण देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, तत्कालीन राज्यपालांनी घेतलेल्या आक्षेपामुळे यासंदर्भातील अध्यादेश रखडला होता. मात्र 3 हजार एकर जमीन शेतकऱ्यांना परत देण्याचा सरकारचा निर्णय आजही कायम आहे. लवकरच हा प्रस्ताव पुन्हा मंत्रिमंडळासमोर मांडून अध्यादेशाद्वारे पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, तसेच आपण स्वतः आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधू, असा शब्दही त्यांनी दिला आहे. सागर बेग प्रकरणावर भाष्य करण्यास विखे पाटलांचा नकार दुसरीकडे, हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या संबंधित महिलेने नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांच्या दबावामुळेच आपण ही तक्रार दाखल केली होती, असा दावा या महिलेने केला. या गंभीर प्रकरणाबाबत विचारले असता, राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर अधिक भाष्य करण्यास स्पष्टपणे नकार दिला. पोलिसांची सविस्तर चौकशी पूर्ण झाल्यानंतर खरी वस्तुस्थिती आपोआप समोर येईल; त्यामुळे आताच काही बोलून आपल्या कोणत्याही वक्तव्याचा चालू तपासावर प्रभाव पडू नये, याच कारणासाठी आपण या विषयावर बोलणे टाळत असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत