Headlines

नाशिक 5 दिवसांत खड्डेमुक्त करणार!:बनावट वर्कऑर्डर प्रकरणात माझाच दूरचा नातेवाईक दोषी, त्यालाही सोडणार नाही – गिरीश महाजन




नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि आगामी कुंभमेळ्याच्या नावाने कोट्यवधी रुपयांची बोगस वर्कऑर्डर देण्याच्या मोठ्या घोटाळ्यावर राज्याचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, बनावट वर्कऑर्डर घोटाळ्यातील मुख्य आरोपी हा त्यांचा दूरचा नातेवाईक असला, तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्वतःच पोलिसांना दिले आहेत. तसेच, येत्या 4-5 दिवसांत नाशिक शहर ‘खड्डेमुक्त’ करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. नाशिकचे रस्ते आणि खड्ड्यांचा प्रश्न नाशिक शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर बोलताना पालकमंत्री महाजन म्हणाले, “सततचा पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांवर खड्डे पडले होते, हे खरे आहे. मात्र, त्यापैकी 80 टक्क्यांहून अधिक खड्डे आम्ही बुजवले आहेत. येत्या 4 ते 5 दिवसांत आम्ही नाशिक शहर संपूर्णपणे ‘खड्डेमुक्त’ करू. तसेच, शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी आणि कॉलनींमधील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री महोदयांकडून विशेष निधी मंजूर करून घेतला आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर नाशिक शहराचा चेहरामोहरा नक्कीच बदलेल.” कुंभमेळा बनावट वर्कऑर्डर घोटाळा, मीच सर्वप्रथम तक्रार केली कुंभमेळ्याच्या नावाने तब्बल 100 कोटी रुपयांच्या बोगस वर्कऑर्डर देऊन ठेकेदारांना फसवल्याचे मोठे रॅकेट नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणात जामनेरमधील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये गिरीश महाजन यांच्या नातेवाईकाचाही समावेश आहे. यावर महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. कसे उघडकीस आले प्रकरण? “संभाजीनगरचे काही ठेकेदार माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ही वर्कऑर्डर दाखवली. मी तत्काळ कुंभमेळ्याचे अधिकारी डॉ. गेडाम आणि पोलीस आयुक्त (CP) कर्णिक साहेब यांच्याशी संपर्क साधला. आम्ही सर्वांनी ती कागदपत्रे तपासली आणि ती पूर्णपणे ‘फेक’ असल्याचे उघड झाले. मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि पोलिसांना तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण बाहेर येण्यापूर्वी मीच सर्वप्रथम प्रेस घेऊन या घोटाळ्याची माहिती उघड केली.” माझा दूरचा नातेवाईक सराईत गुन्हेगार या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आपला नातेवाईक असल्याचे मान्य करत महाजन म्हणाले, “होय, तो माझा दूरचा नातेवाईक आहे. पण तो या असल्या भामटेगिरीत सराईत आहे, हे संपूर्ण गावाला माहीत आहे. त्याचा या सर्व गोष्टींत हातखंडा आहे. त्याच्यासोबत धुळ्याचाही एक व्यक्ती सहभागी आहे. मी पोलिसांना स्पष्ट सांगितले आहे की, तो कोणीही असला तरी त्याला सोडायची गरज नाही. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” ठेकेदारांच्या शहाणपणावरही प्रश्नचिन्ह फसवणूक झालेल्या ठेकेदारांच्या भूमिकेवरही महाजन यांनी ताशेरे ओढले. “जे लोक ही वर्कऑर्डर घेत होते, त्यांनीही विचार करायला हवा होता ना! 100 कोटी रुपयांचे टेंडर तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही त्यासाठी ईएमडी (EMD – अमानत रक्कम) भरत नाही, कोणतीही प्रक्रिया करत नाही, तरीही तुम्हाला वर्कऑर्डर कशी काय मिळते? केवळ 10 लाखांच्या कामालाही टेंडर लागते. टेंडर न भरता शंभर कोटींची वर्कऑर्डर घेणे, हा निव्वळ शुद्ध मूर्खपणा आहे. या प्रकरणात देणारे आणि घेणारे (ठेकेदार) दोन्हीही दोषी आहेत,” असे परखड मत त्यांनी मांडले. विरोधकांना राजकारण करायचे आहे, फोटोंवरून गुन्हेगार ठरत नसतो आरोपींसोबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंबाबत विचारले असता, गिरीश महाजन यांनी विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले, “माझ्यासोबत आज सकाळपासून 500 लोकांनी फोटो काढले असतील. तो माझ्या गावचा (जामनेरचा) आहे आणि माझा दूरचा नातेवाईक आहे, त्यामुळे एखाद्या घरगुती कार्यक्रमात चुकून एखादा फोटो असेलही. पण नुसता फोटो आहे म्हणून मी गुन्हेगार ठरतो का? देशातल्या मोठ्या नेत्यांसोबत बॉम्ब ब्लास्टचे आरोपी विमानात बसलेले, त्यांच्यासोबत फोटो काढलेले आपण पाहिले आहेत. अनेक मंत्री असे आहेत ज्यांचे सख्खे नातेवाईक जेलमध्ये गेले आहेत, त्यांचा मी नामोल्लेख करत नाही. विरोधकांना केवळ गदारोळ आणि राजकारण करायचे असल्याने ते असले आरोप करत आहेत.” हेही वाचा… लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षणाची लवकर अंमलबजावणी करा:खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे मागणी लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या महिला आरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महिला आरक्षणाचे विधेयक 2023 मध्ये लोकसभा आणि राज्यसभेत सर्वपक्षीय सहमतीने मंजूर झाले आहे. त्यामुळे आता त्याच्या अंमलबजावणीसाठी आणखी विलंब होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत