Headlines

43 मोटारसायकली… 30 लाख किंमत


निडगलचा अट्टल मोटारसायकल चोर कित्तूर पोलिसांच्या जाळ्यात

त् त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : खानापूर तालुक्यातील एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याजवळून सुमारे 30 लाख रुपये किमतीच्या 43 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. कित्तूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तो केवळ स्प्लेंडर मोटारसायकली लक्ष्य बनवित होता. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यातील विविध जिल्ह्यात त्याने चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.

नारायण मनोहर कदम (वय 32) राहणार निडगल, ता. खानापूर असे या अट्टल मोटारसायकल चोराचे नाव आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी बुधवारी कित्तूर येथे पत्रकारांना या कारवाईसंबंधी माहिती दिली आहे. नारायणने बेळगाव, धारवाड, गदग व कारवार जिल्ह्यात चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याजवळून जप्त केलेल्या 43 वाहनांपैकी 41 स्प्लेंडर आहेत.

कित्तूर येथील एपीएमसी गेटजवळ उभी करण्यात आलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकलची चोरी झाली होती. 12 जानेवारी 2026 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना 4 ऑगस्ट 2026 रोजी एम. के. हुबळी येथील पारिश्वाड क्रॉसजवळ नंबरप्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून फिरताना नारायणला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने तब्बल 43 मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली.

गेल्या दोन वर्षात कित्तूर, हिरेबागेवाडी, संकेश्वर, कलघटगी, यल्लापूर, सौंदत्ती, गरग, कुंदगोळ, हल्याळ, काकती, अंकलगी, लक्ष्मेश्वर, धारवाड ग्रामीण व हुबळी उपनगर पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. तीन दिवस पोलीस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात आली असून शुक्रवार दि. 7 ऑगस्ट रोजी कित्तूर येथील जेएमएफसी न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी न्यायालयीन  कोठडीत करण्यात आली आहे.

बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, उपनिरीक्षक भरत एस., उपनिरीक्षक जी. जी. हंपण्णावर, शरीफ दफेदार, अदृश्यप्पा चिक्केरी, नागराज कडगन्नावर, सुनील मुरगोड, बाहुबली अगशीमनी, हणमंत जिवापूर, एम. बी. कंबार, एम. एस. हळ्ळी, एम. आर. लमाणी, तांत्रिक विभागाचे सचिन पाटील आदेंनी ही कारवाई केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत