Headlines

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच!:IIT बॉम्बेमधील दोन कॅन्टीनवर FDA ची मोठी कारवाई, व्यवसाय तात्काळ बंद




अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यात धडक कारवाया सुरू झाल्या असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल आणि मेसवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून एफडीएने आता आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) दोन कॅन्टीनला ‘स्टॉप बिझनेस नोटीस’ बजावून ती तात्काळ बंद करण्याची कारवाई केली आहे, तर आणखी एका तिसऱ्या कॅन्टीनला त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा नोटीस बजावली आहे. बुधवारी करण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत, भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या परवान्याविना चालवल्या जाणाऱ्या दोन कॅन्टीनवर व्यवसाय तात्काळ बंद करण्याची (स्टॉप बिझनेस) धडक कारवाई करण्यात आली. तर, वैध परवाना असूनही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिसऱ्या कॅन्टीनला त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई एका तक्रारीच्या आधारे करण्यात आली होती. मात्र ही तक्रार विद्यार्थ्यांकडून आली होती की अन्य कोणाकडून, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परवान्याविना चालणाऱ्या या कॅन्टीनपैकी एक कॅन्टीन कोणत्याही खासगी कंत्राटदाराविना थेट विद्यार्थी संघटना किंवा संस्थेकडूनच चालवले जात होते. तपासणीसाठी पथक पोहोचले तेव्हा तेथे मोठ्या संख्येने विद्यार्थी जेवण करत होते. या कारवाईमुळे कॅन्टीन बंद झाल्याने आपल्या जेवणाची व्यवस्था कशी होणार, असा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. त्यावर मुंबईमध्ये FSSAI परवाना असलेली अनेक अधिकृत खाद्यपदार्थ विक्री केंद्रे उपलब्ध असून, विद्यार्थी तेथे जेवणाची सोय करू शकतात, असे FDA अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्र FDA कडून अन्न आस्थापनांवर सुरू असलेल्या या धडक कारवाईचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. देशातील हॉटेल आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रातील तीन प्रमुख संघटनांनी या मोहिमेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच, प्रशासनाकडून होणारी ही कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील योग्य प्रक्रियेचे काटेकोर पालन करूनच केली जावी, अशी विनंतीही या संघटनांनी पत्राद्वारे केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत