Headlines

कुडाळनंतर झळकले सावंतवाडीत ‘मी Gen Z’ फलक


सावंतवाडी, प्रतिनिधी : नीट परीक्षा घोटाळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता राज्यनिहाय आणि जिल्हानिहाय विविध ठिकाणी नव्या प्रकारच्या पोस्टर्सची चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कुडाळनंतर आता सावंतवाडी शहरातही “मी Gen Z आहे… मी दोघांच्याही बाजूने आहे” असे मजकूर असलेले फलक झळकल्याने विविध स्तरांवर चर्चा रंगली आहे.

हे फलक सावंतवाडी एसटी बसस्थानक परिसर तसेच नगरपालिका तिठा मार्गावर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स नेमके कोणी लावले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून शहरात याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीवर या पोस्टर्सकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. गेल्या अनेक वर्षांत सिंधुदुर्गच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर ठोस विरोधी चळवळी फारशा दिसून आल्या नाहीत. अशा परिस्थितीत “मी Gen Z आहे” या संदेशाचे पोस्टर्स नव्या सामाजिक किंवा विद्यार्थी चळवळीची नांदी ठरणार का, अशी चर्चा सावंतवाडीत सुरू झाली आहे.

या पोस्टर्सपैकी एका फलकावर “विद्यार्थ्यांचा मान, देवतांचा सन्मान” असा संदेश देण्यात आला असून त्यामध्ये राम मंदिराचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. या माध्यमातून “देवतांचाही सन्मान राखा आणि विद्यार्थ्यांचाही मान राखा” असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते.

दुसऱ्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असून त्यांच्या पाठीमागे मोबाईल आणि टॅब हातात घेतलेले विद्यार्थी दाखविण्यात आले आहेत. त्यावर “मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी… मी भारत सरकारचा सन्मान करतो.” असा मजकूर असून पोस्टरमध्ये राष्ट्रप्रेमालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. “राष्ट्रप्रेम” ही या मोहिमेची टॅगलाईन असल्याचेही पोस्टरवरून स्पष्ट होते. या पोस्टर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून, हा नवा प्रयोग सत्ताधारी आणि राजकीय वर्तुळासाठीही चर्चेचा विषय ठरत आहे. कुडाळनंतर सावंतवाडीतही असे फलक झळकल्याने येत्या काळात जिल्ह्यातील इतर तालुके, शहरे आणि ग्रामीण भागातही अशाच प्रकारचे पोस्टर्स दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कॉकरोच पार्टीचे प्रमुख अभिषेक दिपके यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत राज्यभर आणि जिल्हानिहाय पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्याचा मानस व्यक्त केल्याचे सांगितले जाते. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत झळकलेले हे पोस्टर्स त्या मोहिमेचाच भाग आहेत का, याबाबतही चर्चा सुरू आहे. येत्या काळात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर “मी Gen Z” या अभियानाशी जोडले जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत