सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुढील वीस वर्षांचा विचार करून कायमस्वरूपी पार्किंग झोन, वन-वे पार्किंग व्यवस्था आणि रस्त्यांचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी येत्या गणेश चतुर्थीपासून करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी दिली.
यासंदर्भात सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात वाहतूक नियंत्रणाबाबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यापारी, रिक्षा व टेम्पो चालक-मालक, नगरसेवक, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) तसेच राज्य परिवहन (एसटी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, वन-वे व्यवस्था आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, आरटीओ अधिकारी संकेत सोमण, एसटी विभागाच्या वाहतूक व्यवस्थापक गौतमी कुबडे, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, तसेच आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दीपाली भालेकर, नीलम नाईक, अॅड. सिद्धार्थ भाबुरे, अजय गोंदावकर, अॅड. सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर, तौकीर शेख, सुनीता पेडणेकर, स्नेहा नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, राजू मसुरकर, विशाल सावंत, बाळू सावंत, जगदीश मांजरेकर, बाळासाहेब बोर्डेकर, श्रीपाद चोडणकर, पुंडलिक दळवी, राजू पनवेलकर, दत्ता सावंत, सुनील नाईक, सुधीर पराडकर, सतीश नार्वेकर, हेमंत मुज, रवींद्र प्रभू, बाळू सावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सक्षम करण्यासाठी विविध सूचना मांडण्यात आल्या. त्यानुसार अंतिम आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी गणेशोत्सवापासून करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी स्पष्ट केले.
