Headlines

फक्त 10 मिनिटात बनवा कापसापासून मोदक वस्त्र माळ, लहान मुलं देखील करू शकतील अशी माळ – how to make modak vastra mal by priyas kitchen


गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घर सजवताना स्वतःच्या हाताने केलेल्या सजावटीला विशेष महत्त्व असते.कापसापासून तयार केलेली सुंदर मोदक वस्त्रमाळ अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवता येते.ही आकर्षक माळ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहज तयार करू शकतात.

DIY Modak Vastra Mala,
@Priyas Kitchen
गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली की घर सजवण्याची, पूजेची आणि बाप्पासाठी सुंदर सजावटीच्या वस्तू तयार करण्याची लगबग सुरू होते. बाजारातून अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तू मिळतात, पण स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंमध्ये एक वेगळाच आनंद आणि प्रेम असते. याच विचारातून आपण आज कापसापासून अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी मोदक वस्त्रमाळ तयार करणार आहोत. ही मोदक वस्त्रमाळ बनवण्यासाठी फार वेळ, जास्त साहित्य किंवा विशेष कौशल्याची गरज नाही. अगदी ५ ते १० मिनिटांत ही माळ तयार करता येते. विशेष म्हणजे ही कलाकृती लहान मुलं, गृहिणी तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तीदेखील सहज तयार करू शकतात. (फोटो सौजन्य :- @Priyas Kitchen)

मोदक वस्त्रमाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मोदक वस्त्रमाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ही सुंदर मोदक माळ तयार करण्यासाठी आपल्याला घरातील सहज उपलब्ध होणारे साहित्य लागते.
मेडिकल कॉटन किंवा साधा कापूस
चित्रकलेच्या वहीतील जाडसर पांढरा कागद किंवा कार्डबोर्ड
पाच रुपयांचे नाणे (गोल आकारासाठी)
फेविकॉल
कात्री
पेन
रिबन किंवा सजावटीची दोरी
इतके साधे साहित्य वापरून आपण गणपती बाप्पासाठी आकर्षक सजावट तयार करू शकतो.

मोदकाचा बेस तयार करण्याची पद्धत

मोदकाचा बेस तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम कार्डबोर्ड किंवा जाड कागद घ्यावा. त्यावर पाच रुपयांच्या नाण्याच्या आकाराचे गोल काढून घ्यावेत. आपल्याला जितके मोदक बनवायचे आहेत तितके गोल तयार करून घ्यावेत.उदाहरणार्थ, ११ मोदकांची माळ बनवायची असेल तर ११ गोल आकार काढून कात्रीने व्यवस्थित कापून घ्यावेत. कार्डबोर्ड उपलब्ध नसेल तर वहीचे जाडसर पान किंवा घरातील एखादा पुठ्ठा देखील वापरता येतो. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचा कागद वापरावा, कारण मोदकाचा रंग पांढरा असल्यामुळे तो अधिक सुंदर दिसतो.

कापसाच्या वाती तयार करणे

कापसाच्या वाती तयार करणे

यानंतर मोदकाच्या पाकळ्यांसाठी कापसाच्या छोट्या वाती तयार करायच्या आहेत. मेडिकल कॉटनचा थोडासा भाग घेऊन हाताने हलक्या हाताने फिरवून वाती बनवाव्यात.या वाती फार पातळ नसाव्यात. थोड्या जाडसर असतील तर मोदकाला छान फुगवटा येतो. वातींची दोन्ही टोकं थोडी पातळ केली तर मोदकाचा आकार अधिक सुंदर दिसतो. जर बाजारातील तयार कापसाच्या वाती उपलब्ध असतील तर त्या देखील वापरता येतात. त्यामुळे काम आणखी सोपे आणि जलद होते.

मोदकाचा आकार तयार करण्याची कृती

मोदकाचा आकार तयार करण्याची कृती

आता तयार केलेल्या गोल कागदावर फेविकॉल लावावा. त्यानंतर कापसाच्या वाती गोलाच्या आजूबाजूला चिकटवायला सुरुवात करावी.ज्या पद्धतीने लहानपणी सूर्याचे चित्र काढताना त्याला किरण लावायचो, त्याच प्रकारे गोलाच्या चारही बाजूंनी वाती लावायच्या आहेत.
साधारण एका मोदकासाठी ११ ते १२ वाती पुरेशा होतात. वाती समान अंतरावर चिकटवल्या तर मोदक अधिक नीटनेटका दिसतो.आता मोदकाच्या मधल्या भागात सारण असल्यासारखा फुगवटा तयार करण्यासाठी थोडासा कापूस घ्यावा. त्याला हाताने गोल आकार द्यावा आणि मोदकाच्या मध्यभागी ठेवावा.

कापसाची मोदक वस्त्रमाळ

मोदकाला सुंदर उंच करा

मोदकाला सुंदर उंच करा

यानंतर सर्व कापसाच्या वाती वरच्या बाजूला एकत्र आणाव्यात. त्या व्यवस्थित जुळवून हलक्या हाताने दाबाव्यात. त्यामुळे मोदकाला सुंदर उंच आणि फुगीर आकार मिळतो.जर काही वाती मोठ्या किंवा वेड्यावाकड्या दिसत असतील तर त्या हाताने व्यवस्थित करून घ्याव्यात. वरचा अतिरिक्त कापूस काढून टाकावा आणि मोदकाच्या शेंड्याला थोडा पीळ द्यावा.अशा प्रकारे अगदी खऱ्या मोदकासारखा दिसणारा सुंदर कापसाचा मोदक तयार होतो.

मोदकाच्या सजावटीसाठी

मोदकाच्या सजावटीसाठी

मोदक तयार झाल्यानंतर त्यावर थोडासा केशरयुक्त अष्टगंध, कुंकू किंवा लाल रंगाचा छोटासा टिळा लावू शकतो.यामुळे मोदक अधिक आकर्षक दिसतो आणि त्याला पूजेच्या सजावटीसाठी सुंदर पारंपरिक रूप मिळते.अशाच पद्धतीने ११, २१ किंवा आपल्या गरजेनुसार अधिक मोदक तयार करून घ्यावेत.

मोदकांची माळ तयार करण्याची पद्धत

मोदकांची माळ तयार करण्याची पद्धत

आता तयार केलेले मोदक एका माळेत गुंफायचे आहेत. यासाठी एक सुंदर रिबन किंवा सजावटीची दोरी घ्यावी.रिबनच्या मध्यभागी हलक्या हाताने स्टेपलर मारून आकार द्यावा किंवा फेविकॉलच्या मदतीने जोड तयार करावी. यामुळे माळेला कंठीसारखा आकार मिळतो.यानंतर प्रत्येक मोदकाच्या मागील बाजूस थोडासा फेविकॉल लावून तो रिबनवर चिकटवावा.मोदक चिकटवताना प्रत्येकामध्ये समान अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे. अंतर सारखे असेल तर माळ अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते.काही वेळातच आपली सुंदर मोदक वस्त्रमाळ तयार होते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा