Headlines

आर्थिक अडचणीतून उच्च शिक्षित कुटुंबाची सामूहिक आत्महत्या:'सुसाईड नोट' लिहून संपवले जीवन, पिंपरी-चिंचवडमधील घटना




पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून एका उच्चशिक्षित आणि सुखी मानल्या जाणाऱ्या त्रिकोणी कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे जीवन संपवले आहे. विषारी रसायनाचा (सोडियम नायट्रेट) धूर घेऊन या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. विनोद पिल्ले (५०), त्यांची पत्नी सिरजा पिल्ले (४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले (१९) अशी या दुर्दैवी मृतांची नावे आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पिल्ले कुटुंबावर मोठे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे याच विचारात कुटुंब होते. त्यांनी तीन वर्षांपूर्वी आपले नेहरूनगर येथील स्वतःचे घर विकले होते. त्यानंतर हे पिल्ले कुटुंब सध्या मोरवाडी येथील ‘करिष्मा ग्लोरी’ सोसायटीत भाड्याने राहत होते. सिरजा पिल्ले या एका शाळेत नोकरीला होत्या. त्या शाळेत न गेल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर जेव्हा लोक त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा विनोद पिल्ले यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचवेळी घरात बेशुद्ध आणि अत्यंत गंभीर अवस्थेत सापडलेल्या सिरजा आणि पौर्णिमा यांना तातडीने पिंपरीतील वायसीएम (YCM) रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान आज (२ ऑगस्ट) माय-लेकीचीही प्राणज्योत मालवली. अत्यंत उच्चशिक्षित होते कुटुंब हे कुटुंब अत्यंत उच्चशिक्षित होते, त्यामुळे त्यांच्या या टोकाच्या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. विनोद पिल्ले यांनी देशातील नामांकित संस्था ‘आयआयएम अहमदाबाद’ येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घेतले होते. २०२४ पर्यंत ते एका चांगल्या कंपनीत कार्यरत होते. हल्ली ते ‘वर्क फ्रॉम होम’ करत असल्याचे मित्रांना सांगत असत. पत्नी सिरजा या मोरवाडी परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ‘कोऑर्डिनेटर’ (समन्वयक) म्हणून काम करत होत्या. तर १९ वर्षीय मुलगी पौर्णिमा ही पिंपरी-चिंचवडमधीलच एका नामांकित महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती. सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे? घटनेचा तपास करणाऱ्या संत तुकाराम नगर पोलिसांनी घटनास्थळावरून एक ‘सुसाईड नोट’ (आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी) जप्त केली आहे. या चिठ्ठीत विनोद पिल्ले यांनी स्पष्ट केले आहे की, “आम्ही आर्थिक विवंचनेतून आणि वाढलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे हे टोकाचे पाऊल उचलत आहोत. आमच्या मृत्यूला अन्य कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये.” विषारी धूर घेऊन शेवट तपासात असे निष्पन्न झाले आहे की, विनोद पिल्ले यांनी १ जून रोजी ऑनलाइन माध्यमातून एक रासायनिक द्रव्य मागवले होते. घरात कोळशावर हे द्रव्य (सोडियम नायट्रेटसारखे विषारी रसायन) जाळून त्यांनी त्याचा विषारी धूर सर्वत्र पसरवला, ज्यामुळे गुदमरून या तिघांचाही करुण अंत झाला. या हृदयद्रावक प्रकरणाचा संत तुकाराम नगर पोलिस अधिक तपास करत आहेत. हे ही वाचा… धर्म सरकारच्या नियंत्रणात नाही!:’महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्या’विरोधात हायकोर्टात जाणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या सुधारित ‘धर्म स्वातंत्र्य कायद्या’विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर करत, आंबेडकर यांनी E20 इंधनाचा वाद, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाया आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सरकारवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत