मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
वृत्तसंस्था/चेन्नई
मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडूचे माजी मंत्री आणि डीएमके आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर बालाजी यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाच्या तपासाशी संबंधित आहे. आरोपांचे स्वरूप पाहता कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती जी. के. इलंथिरन यांनी अर्ज फेटाळताना नोंदवले. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. आरोपींनी आपल्या अधिकृत पदांचा गैरवापर केला, गुन्हेगारी कट रचला आणि सरकारी तिजोरीचे मोठे आर्थिक नुकसान केले अशा फिर्यादीच्या दाव्याचीही न्यायालयाने नोंद घेतली. आरोपांमध्ये गुन्हेगारी कट, विश्वासघात, फसवणूक, नोंदींमध्ये फेरफार आणि भ्रष्टाचार यांचा समावेश आहे.
