Headlines

वृद्ध कलावंतांना दोन वर्षांचे थकीत मानधन मिळेना:वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून प्रतिसाद नाही




अमरावती | राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५० वृद्ध साहित्यिक व कलावंतांना तब्बल दोन वर्षांचे थकीत मानधन अद्यापही मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी असून, संतप्त कलावंतांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईमार्फत ही योजना राबवली जाते. कोरोना काळापासून जिल्ह्यातील सुमारे ७५० प्रस्ताव निवड समितीच्या सभांअभावी प्रलंबित होते. डिसेंबर २०२४ मध्ये जिल्हा निवड समितीने मुलाखती घेऊन यापैकी १५० वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी दिली. या १५० प्रस्तावांमध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील १०० आणि २०२३-२४ मधील ५० प्रस्तावांचा समावेश होता. मात्र, या कलावंतांना त्या-त्या आर्थिक वर्षाच्या अखेरपासून मानधन देण्याऐवजी एप्रिल २०२५ पासून डीबीटी प्रणालीद्वारे दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यास सुरुवात झाली. वास्तविक, २०२२-२३ मधील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल २०२३ पासून तर २०२३-२४ मधील मंजूर ५० कलावंतांना एप्रिल २०२४ पासून मासिक मानधन मिळणे अपेक्षित होते. या दोन वर्षांच्या थकीत मानधनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे कलावंत थकीत मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. अर्ज छाननी प्रक्रिया किंवा अर्जामध्ये त्रुटी नसताना केवळ निवड समितीच्या बैठका वेळेवर न झाल्यामुळे ७५० प्रस्ताव प्रलंबित राहिले. त्यापैकी केवळ १५० प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने उर्वरित ६०० कलावंतांना पुढील वर्षासाठी नवीन अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणा व दिरंगाईचा आर्थिक फटका कलावंतांना बसणे अन्यायकारक असल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. अर्ज वेळेत दाखल करूनही प्रशासनाच्या चुकीमुळे प्रस्ताव प्रलंबित ठेवून निवड प्रक्रिया लांबणीवर पडली असेल, तर याची शिक्षा कलावंतांना का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दोन्ही वर्षांच्या थकीत मानधनाचा बॅकलॉग कोण भरून काढणार आणि यासाठी जबाबदार कोण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी कलावंतांनी केली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील शेकडो कलावंतांचा विचार करून दरवर्षीचा लाभार्थी इष्टांक वाढवावा, तसेच त्या १५० लाभार्थी कलावंतांच्या थकीत मानधनाची रक्कम “धोरणात्मक निर्णय” घेऊन तातडीने मंजूर करून पात्र कलावंतांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी कलावंत व साहित्यिक आधार संघाचे समन्वयक प्रमोद पोकळे, संघटक भोलेश्वर मुदगल, प्रकाश वानखडे, रवींद्र बन, योगीराज राघोर्ते, सुभाष सुने, विजय दारोकार, शिवाजी उंबरकर, दिनकर कांडलकर, सुभाष भारती, अनिल गवारे व अन्य कलावंत उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत