Headlines

राज्यात 2 हजार शाळा बंद, पेपरफुटी सुरूच:शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊतांचा मोदी-शहांसह राज्य सरकारवर हल्लाबोल




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असून, राज्यात बोगस डिग्रीचा मोठा स्कॅम सुरू आहे,” असा आरोप राऊत यांनी केला आहे. पेपरफुटी, नवीन शाळांच्या मंजुरीतील भ्रष्टाचार आणि शिक्षकांना लावली जाणारी अवांतर कामे यावरून त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. तसेच, न्याय मागणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना राज्याचे मुख्यमंत्री शिव्या घालत असल्याचा गंभीर दावाही त्यांनी यावेळी केला. ‘मुख्यमंत्री आंदोलक विद्यार्थ्यांना शिव्या घालतात’ संजय राऊत यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर चिंता व्यक्त करत राज्य सरकारला फैलावर घेतले. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या शिक्षणात सध्या मोठी अराजकता माजली आहे. सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत अजिबात गांभीर्य राहिलेले नाही. हक्क आणि न्याय मागायला जाणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना राज्याचे मुख्यमंत्री चक्क शिव्या घालत आहेत, ही राज्यासाठी अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे.” राज्यात ‘बोगस डिग्री स्कॅम’; राऊतांचा गौप्यस्फोट राज्यात शिक्षणाचा बाजार मांडला असल्याचा आरोप करत राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. “महाराष्ट्रात सध्या बोगस डिग्री स्कॅम सुरू आहे. वाटल्या जाणाऱ्या १० पैकी २ डिग्री या बोगस असतात. माझ्याकडे या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि पुरावेही आहेत,” असा मोठा दावा त्यांनी केला. “नवीन शाळा मंजुरीसाठी ५-१० लाखांची लाच” राज्यातील पेपरफुटीचे सत्र सुरूच असून सरकार त्याबाबत अजिबात गंभीर नाही, अशी टीका राऊत यांनी केली. शिक्षणातील भ्रष्टाचारावर बोलताना ते म्हणाले की, “नवीन शाळांना मंजुरी देण्यासाठी संस्थाचालकांकडून ५ ते १० लाख रुपये उकळले जात आहेत. पैशांशिवाय शिक्षणात कोणतेही काम होत नाही.” असा आरोप राऊत यांनी केला. “शिक्षकांची कामे बेरोजगार तरुणांना द्या” एकीकडे नवीन शाळांना मंजुरी दिली जात असताना दुसरीकडे राज्यातील तब्बल २ हजार शाळा बंद पडल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली. शिक्षकांना लावल्या जाणाऱ्या शालाबाह्य कामांवर (सर्व्हेक्षण आणि इतर कामे) त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “तुम्ही शिक्षकांना इतर अवांतर कामे लावली आहेत. जर ते हीच कामे करत राहतील, तर मग त्यांनी मुलांना शिकवायचे कधी? राज्यात अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाही. शासनाची ही सर्व कामे या बेरोजगार मुलांना द्यावीत, जेणेकरून शिक्षकांना फक्त शिकवण्यावर लक्ष केंद्रित करता येईल,” असा सल्ला राऊत यांनी दिला. मोदी-शहांवर निशाणा केंद्रात बसलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला. केंद्रात मोदी-शहा राजकारणात मग्न आहेत आणि इकडे महाराष्ट्रात शिक्षण रसातळाला गेले आहे. राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. हेही वाचा.. पुणे विद्यापीठात 3 लाखांत डिग्री?:हा सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा अवमान, रोहित पवारांचा घणाघात; राज्यपालांकडे चौकशीची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांच्या मोबदल्यात बोगस पदव्या दिल्या जात असल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रासाठी हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत